आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईसह देशभरातील संगीत कंपन्यांवर छापे; राॅयल्टी बुडवल्याच्या संशयावरून ईडीची कारवाई

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- स्वामित्व हक्क  (राॅयल्टी) बुडवल्याप्रकरणी इंडियन परफॉर्मिंग राइट साेसायटी व पाेनाेग्राफिक परफाॅर्मन्स लिमिटेड यांच्यावर  गुन्हा दाखल करण्यात अाला हाेता. त्याप्रकरणी पुरावे गाेळा करण्यासाठी सक्त वसुली संचालनालयाने शुक्रवारी मुंबई, दिल्ली, काेलकाता येथील अाठ ठिकाणांवर छापे टाकले. मुंबईत पाच ठिकाणी  छापे टाकण्यात अाले अाहेत. या छाप्यांमुळे चित्रपटसृष्टीशी संबंधित कंपन्यांमध्ये खळबळ उडाली असून अाणखी महत्त्वाची माहिती हाती लागण्याची शक्यता आहे.   

युनिव्हर्सल, टी सिरीज, सा रे ग म, यश राज फिल्म्स व सोनी या कंपन्यांच्या संबंधित कार्यालयांवर ही शोधमोहीम राबवण्यात आली. त्यात मुंबईतील पाच, दिल्लीतील दोन व कोलकाता येथील एका ठिकाणाचा समावेश आहे. याप्रकरणी मे महिन्यात ईडीने या प्रकरणातील एक तक्रारदार गीतकार जावेद अख्तर यांचा जबाब नोंदवला होता. स्वामित्व हक्काचे पैसे तसेच आयपीआरएस व पीपीएल यातील  अनियमितता याबाबत    हा गुन्हा दाखल करण्यात आला होता.   

‘आयपीआरएस’ची स्थापना १९६९ मध्ये करण्यात अाली हाेती.  आयपीआरएस देशांतर्गत संगीत व गाण्याच्या वापराबाबतचे परवाने जारी करते. तसेच गाणी व संगीताच्या वापराचे स्वामित्व हक्काचे पैसे घेऊन ते स्वामित्व हक्क असलेल्या व्यक्तीकडे सुपूर्द करते. पीपीएलकडे सात लाख  स्टेज परफॉर्मन्स व रेडिओत वाजवली जाणाऱ्या गाण्यांचे हक्क देण्यात आले आहेत. त्यातील अनियमिततेबाबत ईडी तपास करत आहे. त्यामुळे गीतकार व संगीतकारांना स्वामित्व हक्काचे पैसे मिळत नसल्याचा आरोप अनेकांनी केला. तसेच काही प्रकरणांमध्ये या म्युझिक कंपन्याही थेट स्वामित्व हक्काचे पैसे घेतात. पण ती रक्कमही पुढे संगीतकार व गीतकारांना दिली जात नसल्याच्या संशयावरून हे छापे टाकण्यात आले. या आरोपींची पडताळणी सुरू असल्याचेही सूत्रांनी सांगितले.   
 
बाेगस कंपन्यांतून मनी लाँडरिंग?   
सोनी, सारेगामा, टी सिरीज, यशराज आदी म्युझिक कंपन्यांच्या देशभरातील कार्यालयांवर ईडीने छापे घातले. या म्युझिक कंपन्यांनी शेल कंपन्यांमार्फत मनी लाँडरिंग केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.  मागील काही काळापासून ईडीने मनी लाँडरिंग, शेल कंपन्यांवर कारवाई सुरू केली आहे. ईडीच्या रडारवर म्युझिक कंपन्या आल्या आहेत. या कंपन्यांनी माेठ्या प्रमाणात बेकायदा अार्थिक व्यवहार केले अाहेत, असे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले अाहे. संगीत क्षेत्रातील अाणखी काही कंपन्या अामच्या रडारवर अाहेत. लवकरच या कंपन्यांवरही कारवाई करण्यात येईल, अशी माहिती ईडीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘दिव्य मराठी’शी बाेलताना दिली.
 
 
बातम्या आणखी आहेत...