आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्वसामान्य जनतेला डाळी आणि खाद्यतेलासाठी जास्त पैसे माेजावे लागणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारने डाळी, तेलबिया व खाद्यतेल यांच्या साठ्यावर घातलेले निर्बंध देवेंद्र फडणवीस सरकारने नुकतेच उठवले अाहेत. व्यापाऱ्यांनी साठेबाजी करण्यास सुरुवात केल्याने या जीवनावश्यक वस्तूंचे दर ३० ते ४० रुपयांनी महागले अाहेत. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना शेतमालाचे भाव थोडे अधिक मिळू लागले असले तरी सर्वसामान्य जनतेला या डाळी वा खाद्यतेलासाठी जास्त पैसे माेजावे लागणार अाहेत.

तेलबिया,डाळी व खाद्यतेले यांच्या साठ्यावर आघाडी सरकारने सप्टेंबर २०१५ पर्यंत निर्बंध घातले होते. अशा निर्बंधामुळे साठेबाजीस चाप बसतो. जीवनावश्यक वस्तूंची कृत्रिम टंचाई निर्माण होत नाही. त्यामुळे या वस्तूंचे दर नियंत्रणात राहण्यास मदत होते व सर्वसामान्य जनतेचे जगणे सुसह्य होत असते. मात्र, राज्याच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने २७ एप्रिल रोजी अधिसूचना काढून तेलबिया, डाळी व खाद्यतेले यांच्या साठ्यावरील नियंत्रण हटवले. त्यामुळे आता ठोक व्यापारी, मिल मालक व किरकोळ व्यापारी यांना या वस्तूंची अमर्याद साठवणूक करता येणार आहे. राज्याला यंदा अवकाळी पाऊस, गारपिटीचा तडाखा बसला आहे. त्यामुळे तूर, मूग, हरभरा, उडीद या कडधान्यांचा व भुईमगू, कारळे, सोयाबीन, करडई या तेलबियांच्या पेऱ्यात २७ टक्के घट झालेली असताना शासनाने या वस्तूंच्या साठेबाजीस मोकळे रान दिल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.

गहू, मका, तांदूळ या तृणधान्यांबाबत भारत स्वयंपूर्ण असून त्यांची निर्यातही करतो. परंतु कडधान्ये व तेलबियांबाबत मात्र आपण आयातीवर अवलंबून आहोत. देशभरात डाळी व तेलबियांचे भाव कडाडले असून टंचाईची परिस्थिती आहे. त्यामुळे केंद्र सरकार या वस्तूंच्या आयातीचा सध्या गंभीरपणे विचार करत आहे. अशा निकट परिस्थितीत राज्य शासनाने जीवनावश्यक वस्तूंवरील निर्बंध हटवल्यामुळे व्यापाऱ्यांचे मात्र भले होण्याची चिन्हे अाहेत.

फायद्याचे दावे अन‌् महागाईचा अाराेप
>कच्च्या मालाचा साठा केल्यास त्यात मोठे भांडवल अडकून पडते. तसेच त्याच्या व्याजाचा भुर्दंड सोसावा लागतो. त्यामुळे व्यापारी हल्ली धान्यांच्या साठेबाजीच्या फंदात पडत नाही.
- वालचंद संचेती, अध्यक्ष, पूना मर्चंट चेंबर्स.

>धान्य निर्बंधमुक्त केल्याने त्याच्या खरेदीला चालना मिळते. त्या स्पर्धेतून शेतकऱ्यांच्या मालाला अधिक भाव मिळतो. त्यामुळे सध्या तूर, सोयाबीनचे भाव वाढलेले आहेत.
- पाशा पटेल, भाजपचे ज्येष्ठ शेतकरी नेते.

> निर्बंध हटवल्याने मराठवाड्यात व्यापारी तूर, उडीद, मूग, सोयाबीन, भुईमूग यांची मोठ्या प्रमाणात खरेदी करत आहेत. केवळ व्यापाऱ्यांचे हित लक्षात घेऊनच फडणवीस सरकारने हा निर्णय घेतला आहे.
- अशोक चव्हाण, काँग्रेस खासदार तथा प्रदेशाध्यक्ष.