आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नोटांचा अंधांना चकवा; एक कोटी दृष्टिहीनांची पंचाईत!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - दृष्टिहीनांना नोटा आकारावरून ओळखता याव्यात यासाठी नोटांचे आकार ठरवताना ‘नॅशनल असोसिएशन फाॅर द ब्लाइंड’ या संस्थेचे मत विचारात घेतले जात होते. मोदी सरकारने सध्या पाचशे आणि दोन हजारांच्या नव्या नोटा छापताना दृष्टिहीनांचा कोणताही विचार केला नाही. तसेच रिझर्व्ह बँकेकडून नाणी एकाच आकारात तयार करण्यात येत आहेत. परिणामी देशातील एक कोटी अंधांना चलन ओळखण्यात अडचणी येत आहेत. या गैरसोयीविरोधात मुंबईच्या नॅशनल असोसिएशन फाॅर द ब्लाइंड (नॅब) मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. नोटांवर ब्रेेल लिपीचा वापर करा आणि नाणी विशिष्ट आकारात बनवा, अशी मागणी याचिकेद्वारे करण्यात आली आहे.

बोलणारा मोबाइल, ब्रेल पुस्तके, जाॅर्ज संगणक अशी उपकरणे आज अंधांचा आधार आहेत. बोलणारा एटीएम आज जागोजागी आहेत. तंत्रविज्ञानाच्या प्रगतीने एकीकडे अंधांचे जीवन सुकर होत असतानाच भारतीय रिझर्व्ह बँकेच्या चलन धोरणाने अंधांना आर्थिक व्यवहार करणे जिकरीचे बनत चालले आहे.

नॅशनल असोसिएशन फाॅर द ब्लाइंड देशभरातील ६५ ब्रँचमध्ये अंधांना चलन ओळखण्याचे वर्षानुवर्षे खास प्रशिक्षण देत आहे. संस्थेने त्यासाठी खास करन्सी अँड सिग्नेचर गाइड असा स्केल बनवला आहे. या गाइडच्या साहाय्याने अंध एका लायनीत सही करू शकतात तसेच बिनचूक नोटा व नाणी ओळखू शकतात. या गाइडवर नोटेची लांबी मोजून ती नोट ओळखता येते. तसेच नाणी गाइडच्या छिद्रातून घालून ओळखण्याची सोय आहे.

गेल्या काही वर्षांत नोटा आणि नाणी यांचे आकार सतत बदलले जात आहेत. सध्याचे रुपयाचे आणि दोन रुपयांचे नाणे एकाच आकाराचे आहे. पाच रुपयांचे आणि पन्नास पैशाचे नाणे हुबेहूब आहेत. दोन हजारांची नोट वीसच्या नोटेच्या आकाराची आहे. पाचशेची नोट शंभर रुपयांपेक्षा कमी आकाराची आहे. त्यामुळे अंधांचा आधार ठरलेले करन्सी गाइड उपकरण आज बिनकामाचे ठरले आहे. परिणामी अंधांना चलन ओळखण्याचे प्रशिक्षण कसे द्यायचे, असा प्रश्न या संस्थेला पडला आहे.

नॅशनल असोसिएशन फाॅर द ब्लाइंड या संस्थेचे म्हणणे विचारात घेऊन रिझर्व्ह बँक नोटांचे आकार व रचना ठरवत असे. मोदी सरकारने पाचशे आणि दोन हजारांच्या ज्या नव्या नोटा सध्या चलनात आणल्या आहेत त्यांचे आकार मात्र आरबीआय अॅक्ट १९३४ अन्वये निर्धारित करण्यात आले आहेत, अशी माहिती ‘आरबीआय’च्या एका अधिकाऱ्याने दिली.

चलनाचे आकार िफक्स करा यासाठी संस्थेने सरकारकडे अर्ज-िवनंत्या केल्या. पण, दखल घेतली नाही. शेवटी अॅड. उदय वारुंजीकर यांच्या मदतीने संस्थेने मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. त्यात आरबीआय, टाकसाळ आणि अर्थ मंत्रालय यांना प्रतिवादी करण्यात आले आहे.

एटीएम पुरेसे नाहीत
देशात बोलणारे एटीएम पुरेसे नाहीत. त्यात नोटांच्या आकारात कुठेही स्टँडर्डायझेशन नाही. शंभर आणि दोन हजारांच्या नव्या नोटांच्या साइडला मार्करच्या खुणा अंधांसाठी आहेत, हा आरबीआयचा दावा सपशेल चुकीचा आहे. - सत्यकुमार सिंग, महासचिव, नॅब, लखनऊ

नाणी चौकोनी हवीत
नाणी पूर्वीप्रमाणे चौकोनी, षटकोनी अशा विविध आकारांची हवीत. नाण्यांच्या कडांवर विशिष्ट मार्क असावेत, तर नोटावर वाॅटरमार्कप्रमाणे ब्रेेल लिपीचा वापर करण्यात यावा. त्यामुळे अंधांना चलन ओळखणे सहज शक्य होईल. - पल्लवी कदम, सीईओ, नॅब, मुंबई.

परदेशात नोटा ओळखण्यासाठी माेबाइल वापरतात. भारतात सिग्नेचर गाइड वापरतात. भारतात नोटांचे, नाण्यांचे आकार सतत बदलत आहेत तसेच त्यांचा आकार एकसमान ठेवला जात आहे. त्यामुळे चलन ओळखण्यासाठी वापरले जाणारे सिग्नेचर गाइड अपयशी ठरले आहे. - जोकीम रापोसे, सचिव, नॅब, मुंबई.
बातम्या आणखी आहेत...