आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रयोगानंतर मुंबई पोलिस दलातील कर्मचाऱ्यांना आठ तासांची ड्यूटी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- अतिरिक्त कामाच्या तासांमुळे हैराण झालेल्या मुंबई पोलिसांना दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत. कारण मुंबई पोलिसांच्या कामाचे तास आठ तासांवर आणण्यासाठी एका वर्षापूर्वी देवनार पोलिस ठाण्यात प्रायोगिक तत्त्वावर सुरू केलेल्या योजनेला एक वर्ष पूर्ण झाले आहे. या कालावधीत देवनार पोलिस ठाण्यात राबवलेल्या प्रयोगामुळे कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर सकारात्मक परिणाम झाल्याचे जाणवल्याने, संपूर्ण मुंबईभरातील पोलिस कर्मचाऱ्यांच्या कामाचे तास टप्प्याटप्प्याने आठ तासांवर आणले जाण्याच्या शक्यतेवर नियोजन सुरू झाले आहे.   
साधारण वर्षभरापूर्वी मुंबई पोलिस दलाच्या आयुक्तपदाचा पदभार सांभाळताच दत्ता पडसलगीकर यांनी पोलिसांच्या कामांचे तास कमी करण्याबाबतची एक योजना तयार करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार देवनार पोलिस ठाण्याचे शिपाई रवींद्र पाटील यांनी एक योजना पोलिस आयुक्तांना सादर केली होती. 

या योजनेचा अभ्यास करण्यासाठी देवनार पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक यशवंत पालवे, पोलिस हवालदार राजकुमार कारंडे, पोलिस नाईक स्नेहा सावंत, शिपाई रवींद्र पाटील आणि ज्योत्स्ना दांगट यांची समिती नेमली होती. या समितीने मुंबईतील विविध पोलिस ठाण्यांना भेटी देऊन या योजनेच्या उपयोगितेबाबतचा अहवाल पोलिस आयुक्तांना सादर केला होता. या अहवालाच्या आधारे पोलिसांसाठी आठ तास कर्तव्य ही योजना देवनार पोलिस ठाण्यात प्रायोगिक तत्त्वावर राबवण्याचे आदेश आयुक्तांनी दिले होते. त्यानुसार ही योजना सुरू झाली.

पोलिसांचा आत्मविश्वास वाढला  
पहिल्या टप्प्यात पोलिस ठाणे अंमलदार, प्रथम शोधपथक व रूटीन रायटर यांच्या कामांचे तास आठ तासांवर आणण्यात आले. हा टप्पा कमालीचा यशस्वी ठरल्याने अंमलदारांचा आत्मविश्वास वाढल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात बीट मार्शल आणि तिसऱ्या टप्प्यात वायरलेस वाहनांवरील कर्मचारी तसेच शेवटच्या चौथ्या टप्प्यात बीट अंमलदार, तपास कर्मचारी आणि कार्यालयीन कर्मचारी यांच्या कामाचे तास आठ तासांवर आणण्यात आले. एकूणच ही योजना कमालीची यशस्वी ठरल्याने मुंबईतील इतरही पोलिस ठाण्यांत टप्प्याटप्प्याने ही योजना राबवण्याचे नियोजन केले जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
बातम्या आणखी आहेत...