आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कृषी खात्यातील आठ हजार कर्मचारी ‘जलसंधारण’मध्ये जाणार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - पाणीटंचाई आणि दुष्काळावर मात करण्यासाठी जलसंधारण विभागाची कामे तातडीने पूर्ण होणे आवश्यक असल्याने कृषी विभागाच्या आठ हजार कर्मचाऱ्यांची लवकरच जलसंधारण विभागात बदली करण्यात येणार असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.
 
एक वर्षापासून याबाबतच्या प्रस्तावावर काम सुरू होते. या प्रस्तावाला राज्य मंत्रिमंडळाची लवकरच मंजुरी मिळणार असल्याची माहिती कृषी विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘दिव्य मराठी’शी बोलताना दिली. यामुळे जलसंधारण विभागाला स्वतःचा हक्काचा कर्मचारी वर्ग मिळणार आहे.   
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळावर मात करण्यासाठी विविध योजना जाहीर केल्या आहेत. २५ हजार गावे दुष्काळमुक्त करण्याची योजना सरकारने आखली असून “जलयुक्त शिवार’ ही त्यापैकीच एक योजना आहे. पाणीसाठा वाढवून दुष्काळ निर्मूलन करण्यासाठी जलसंधारण विभाग सक्षम होणे आवश्यक आहे. जलसंधारण विभागाची जबाबदारी राम शिंदे यांच्याकडे सोपवल्यानंतर विभाग सक्षम करण्याकडे सरकारने पावले उचलली अाहेत.

विभागाला स्वतंत्र यंत्रणा नसल्याने कधी जलसंपदा, तर कधी कृषी विभागाकडून अधिकारी उसनवारीने घेऊन काम केले जात असे. अशी उसनवारी करण्यापेक्षा स्वतःचा कर्मचारी वर्ग असल्यास जलसंधारणाच्या योजना अत्यंत कार्यक्षम पद्धतीने राबवता येतील याची जाणीव मुख्यमंत्री आणि जलसंधारणमंत्री यांना झाल्याने कृषी विभागातील कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी जलसंधारण विभागात बदली करून पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला.
 
गेल्या वर्षी याबाबतचे एक सादरीकरणही मंत्रिमंडळ बैठकीत करण्यात आले होते. स्वतंत्र आयुक्त आणि आयुक्तालयासहित विभागासाठी आवश्यक असणारे अधिकारी, कर्मचाऱ्यांसह जिल्हास्तरावरील, गावपातळीवरील, तालुकास्तरावरील अधिकाऱ्यांबाबतचा सविस्तर अहवाल सादर करण्यात आल्याचेही या अधिकाऱ्याने सांगितले.   
 
असे चालते जलसंधारण विभागाचे काम   
दुष्काळ निर्मूलनाच्या दृष्टीने जलसंधारण विभागाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. मात्र, आजवर हा विभाग दुर्लक्षितच होता. दुष्काळात सरकार तात्पुरत्या स्वरूपात पिण्याच्या पाण्याचे टँकर पुरवते, चारा छावण्या सुरू केल्या जातात. तसेच दीर्घकालीन उपाययोजनांमध्ये जलसंधारणाच्या कामांवर भर दिला जातो. २५० हेक्टरपर्यंत सिंचन क्षमतेचे सिंचन प्रकल्प या विभागाच्या अंतर्गत येतात. जलसंधारणाच्या इतर लहान-मोठ्या योजना या खात्यामार्फत राबवल्या जातात. जलसंधारण सचिवांकडून या कामांचे प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांना पाठवले जातात. त्यानंतर स्थानिक कृषी, ग्रामविकास, महसूल अथवा जलसंपदा विभागाच्या यंत्रणेकडून ही कामे करून घेतली जातात.

प्रस्ताव मंत्रिमंडळाकडे
कृषी विभागात एकूण २७ हजार ५६१ कर्मचारी आहेत. विविध विभागांतील सचिव स्तरापासून गावपातळीपर्यंत असलेल्या कर्मचाऱ्यांपैकी एकूण आठ हजार कर्मचाऱ्यांची बदली लवकरच जलसंधारण विभागाकडे करण्यात येणार आहे. यासाठी लागणारी आर्थिक तरतूदही करण्यात आली असून मंत्रिमंडळाकडे हा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवला जाणार आहे.
 
बातम्या आणखी आहेत...