मुंबई - दहा हजारांहून अधिक प्रयोग व गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्डने ज्या नाटकाची नोंद घेतली त्या ‘एका लग्नाची गोष्ट’ या नाटकाचा शेवटचा प्रयोग हा नाशकातील कालिदास कलामंदिरात 19 जुलै रोजी होणार आहे.
‘गेला माधव कुणीकडे’, ‘लेकुरे उदंड जाहली’पासून ‘नकळत दिसले सारे’ यासारख्या विविध नाटकांमधून उत्कृष्ट अभिनय करणारे प्रशांत दामले यांचे ‘एका लग्नाची गोष्ट’ हे नाटक देश-परदेशात अजूनही प्रचंड लोकप्रिय आहे. काही महिन्यांपूर्वीच या नाटकाचा शेवटचा प्रयोग नाशिकमध्ये होणार होता. मात्र त्या वेळी दामलेंना हृदयविकाराचा सौम्य झटका आल्याने हा प्रयोग लांबणीवर पडला होता. मात्र, आता 19 जुलै रोजी हा प्रयोग शेवटचा पडदा पडताना बघणार आहे.
या नाटकात दामले यांच्याबरोबर कविता लाड-मेढेकर यांनी काम केले आहे. तसेच मंदा देसाई यांचीही या नाटकात भूमिका होती. श्रीरंग गोडबोले यांनी लिहिलेल्या या नाटकाचे दिग्दर्शन मंगेश कदम यांचे होते. लग्न झालेल्या जोडप्याभोवती खेळीमेळीत फुलवलेली कथा प्रेक्षकांना शेवटपर्यंत गुंतवणारी असल्याने या नाटकाने नेहमीच हाऊसफुल्ल नाट्यगृह बघण्याचे भाग्य अनुभवले. आता शेवटचा प्रयोग कुसुमाग्रजांच्या नगरीत रंगणार असल्याने नाशिककरांना तो पाहण्याची एकमेव संधी आहे.