आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्ज काढून संसार चालवण्यात कसली आली मर्दुमकी?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - राज्यावरील कर्जाचा बोजा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. हे कर्ज कमी करण्याचे सोडाच, या वर्षी 4 हजार कोटींचा तुटीचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला असून कर्ज काढून संसार चालवण्यात कसली आलीय मदरुमकी, अशी घणाघाती टीका करून विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी आघाडी सरकारच्या अर्थशून्य कारभाराचे वाभाडे काढले. विधानसभेत शनिवारी अर्थसंकल्पावर चर्चेला सुरुवात करताना खडसे यांनी आघाडी सरकार तसेच उपमुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवारांवर जोरदार हल्लाबोल करून त्यांना चांगलेच धारेवर धरले.

अर्थमंत्र्यांच्या नियोजनशून्य कारभारामुळे राज्यावरील कर्जाचा डोंगर वाढत चालला आहे. 1199 पासून 2014 पर्यंतच्या कालखंडातील अर्थमंत्र्यांची भाषणे पाहिली, तर अर्थसंकल्पात त्यांनी केलेल्या घोषणा गेल्या 15 वर्षांत कधीच प्रत्यक्षात उतरल्याचे दिसलेले नाही. 4 हजार कोटींचा तुटीचा अर्थसंकल्प सादर करूनही राज्याची आर्थिक स्थिती असल्याची टिमकी कशासाठी वाजवली, असा प्रश्नही खडसे यांनी उपस्थित केला.

कर्जाची श्वेतपत्रिका काढा
कर्मचार्‍यांचा पगारसुद्धा कर्ज काढून दिला जात असून राज्यावरील कर्जाचा बोजा 3 लाख कोटींवर गेला आहे. हे कर्ज कसे कमी करणार, हे सांगण्याऐवजी मुख्यमंत्री कर्ज काढून क्षमता संपलेली नाही, असे सांगून सरकारची पाठ थोपटत आहेत. रस्त्यावरचा भिकारीसुद्धा शेजारच्या भिकार्‍याकडून 90 रुपये उसने घेऊन माझ्याकडे पैसे आहेत, असे सांगेल. कर्ज काढून संसार चालवण्यात कसली आली मदरुमकी? असा प्रश्न करत खडसेंनी कर्जाची श्वेतपत्रिका काढण्याची मागणी केली.

दादा ‘एकच वादा कुठे गेला’
15 वर्षांपूर्वी सत्तेवर आल्यानंतर सरकारने राज्य लोडशेडिंगमुक्त करण्याची घोषणा केली होती. या घोषणेचे काय झाले? अजितदादा तुमचा ‘एकच वादा’ कुठे गेला? राज्यात पुरेशी वीज नसल्याने शेतीपंप काम करत नसल्याने त्याचा अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे. याला मंडळातील भ्रष्टाचार करणीभूत आहे. अजितदादा तुमच्यात हिंमत असेल, तर उरलेल्या चार महिन्यांत राज्य लोडशेडिंगमुक्त करून दाखवावे, असे आव्हान खडसेंनी दिले.