मुंबई- काँग्रेसमध्ये अस्वस्थ असलेले उदयोगमंत्री नारायण राणे यांनी भाजपात येण्याबाबत कोणताही प्रस्ताव दिलेला नाही. तसेच राणे यांनी असा कोणताही प्रस्ताव दिला तरी भाजप याबाबत कसलाही विचार करणार नाही असे भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे. राणे लवकरच काँग्रेसला राम राम करून भाजपमध्ये जाणार असल्याच्या बातम्या येत आहेत. त्याबाबत पत्रकारांनी खडसे यांना छेडले असता राणेंच्या संभाव्य भाजप प्रवेशाला विरोध असल्याचे स्पष्ट उत्तर दिले आहे.
काँग्रेसमध्ये नाराज असलेल्या उद्योगमंत्री राणे यांनी कालच आपल्या समर्थक पदाधिका-यांची व आमदारांची बैठक बोलावली होती. मात्र, सद्य राजकीय परिस्थिती लक्षात घेता कोणताही घाई-घाईने निर्णय घेता थोडे सबुरीने घेणे योग्य होईल अशी भूमिका समर्थक आमदारांनी घेतल्याचे कळते आहे. त्यामुळे राणेंच्या हालचालींचा थांगपत्ता अद्याप लागलेला नाही. दरम्यान, काँग्रेसमध्ये अनेक आमदार मुख्यमंत्री यांच्या कार्यपद्धतीवर नाराज असल्याचे कळते. त्यामुळेच राणे यांना बळ आल्याचे कळते. तसेच राणे दबावाचे राजकारण करीत असल्याचेही राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे. मात्र, राणे भाजपमध्ये जाणार अशी एक चर्चा राजकीय वर्तुळात जोरदार धरू लागली आहे. त्यामुळे राणे काँग्रेसमध्ये राहणार की इतर पक्षात जाणार याबाबत सध्या तर्कवितर्क सुरू आहेत.
राणे गोपीनाथ मुंडे यांच्या संपर्कात होते, त्यांनी राणेंना भेटीचे आश्वासन दिले होते. मात्र, ते दोघे मित्र होते त्यामुळे ती भेट भाजप प्रवेशाबाबत होणार होती की मित्रत्त्वातून याबाबत चर्चा रंगू लागली आहे. पत्रकारांनीही भाजपच्या सर्व नेत्यांकडे याबाबत विचारणा सुरु केली. त्यामुळे खडसे यांनी आज याबाबत खुलासा करून राणे यांनी भाजपात येण्याबाबत कोणताही प्रस्ताव दिलेला नाही. तसेच तसा त्यांचा प्रस्ताव आला तरी त्याबाबत विचार होण्याची कोणतेही शक्यता नसल्याचे सांगत राणेंच्या भाजप प्रवेशाबाबत चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
दुसरीकडे काँग्रेसच्या गोटातून सांगण्यात येत आहे की, प्राप्त परिस्थितीत पक्षातच आपला दबाव गट निर्माण करण्यासाठी राणे खेळी करीत आहेत. मात्र राणे आगीशी खेळत आहेत. ही काँग्रेस आहे येथे दबावाच्या राजकारणाला हायकमांड बळी पडत नसल्याची आठवण एका नेत्याने करून दिली. पक्ष अडचणीत असताना त्याला वेठीस धरण्यामुळे राणे स्वताचे राजकीय वजन कमी करून घेत आहेत असे या नेत्याने सांगितले. दरम्यान, या घडामोडीबाबत राणे यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. मात्र त्यांचे चिरंजीव निलेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली असून, ही बैठक वैयक्तिक होती ती पक्षविरोधी नव्हती असे सांगितले आहे.