आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Eknath Khadse Advice Alies To Fight On Bjp, Shivsena\'s Party Sign

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कमळ, बाणावर मित्रपक्षांनी लढावे, खडसेंचा शेट्टी, मेटे, जानकरांना सल्ला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - महायुतीच्या जागावाटपाची चर्चा अजून प्राथमिक स्तरावर आहे. घटक पक्ष जास्त जागांवर ठाम असताना भाजपने मात्र आपली यादी तयार करण्याचे काम सुरू केले आहे. कोणत्याही परिस्थितीत भाजपची पहिली यादी 20 ऑगस्टपूर्वी जाहीर केली जाईल, असे विधानसभेतील विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले. इतकेच नव्हे, तर महायुतीतील मित्रपक्षांनी कमळ किंवा धनुष्यबाण या चिन्हावर निवडणूक लढवावी, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.

खडसे म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून महायुतीत जागावाटपाची चर्चा सुरू आहे. मात्र, पहिल्या फेरीच्या पुढे ही चर्चा गेलेली नाही. युतीत आता आणखी तीन पक्ष आल्याने जागावाटपाचा फॉर्म्युला तयार करणे अवघड झाले आहे. इतर घटक पक्षांनी जास्त जागांची मागणी केलेली आहे. त्यांना किती व कोणत्या जागा द्यायचा याचा निर्णय लवकर घ्यावा लागणार आहे. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जागावाटप लवकरात लवकर केले पाहिजे, अशी अपेक्षाही खडसे यांनी व्यक्त केली.
ज्यांच्या जागा जास्त, त्यांचाच मुख्यमंत्री
निवडणुकीआधीच शिवसेना व भाजपच्या नेत्यांमध्ये मुख्यमंत्रिपदावरून वाद सुरू आहे. याबाबत खडसे म्हणाले, विनोद तावडे यांनी जे म्हटले आहे तेच बरोबर आहे. शिवसेनेबरोबर आमचा जो 25 वर्षांपूर्वी करार झाला आहे त्यानुसार ज्या पक्षाचे जास्त आमदार त्यांचाच मुख्यमंत्री असणार आहे. बाकी त्यांनी जे इतर दोन पर्याय सुचवले आहेत त्यावर केंद्रीय पातळीवरच निर्णय घेतला जाईल.
घाबरू नका, तुमचा पक्ष संपणार नाही
महायुतीत सामील झालेल्या घटक पक्षांना लोकसभा निवडणुकीच्या वेळेस आम्ही कमळ वा धनुष्यबाण चिन्ह घेऊन निवडणूक लढवा, असे सांगितले होते; परंतु त्यांनी ऐकले नाही. तसे झाले असते तर राज्यात आमच्या आणखी 3-4 जागा नक्कीच वाढल्या असत्या. आता विधानसभा निवडणुकीत तरी मित्रपक्षांनी या दोन चिन्हांवर निवडणूक लढवावी, असे माझे मत आहे. मात्र, असे झाल्यास आमच्या पक्षाची ओळखच संपेल, असे घटक पक्षातील काही नेते सांगतात. मात्र, असे काहीही होणार नाही. रामदास आठवले यांनी राष्ट्रवादीच्या घड्याळावर निवडणूक लढवली तेव्हा ते जिंकले होते, परंतु रिपाइंच्या चिन्हावर अजून त्यांना विजय मिळवता आलेला नाही, याकडेही खडसेंनी लक्ष वेधले.
जागावाटपाची वाट न पाहता पहिली यादी
महायुतीतील जागावाटप रखडले असले, तरी भाजपने आपल्या हक्काच्या मतदारसंघांतील इच्छुकांची नावे आधीच नोंदवून घेतली आहेत. त्यामुळे जागावाटपाचा निर्णय लांबला तरी आपल्या पूर्वीच्या मतदारसंघांतील उमेदवार 20 ऑगस्टला जाहीर करण्याची तयारी भाजपने केली आहे.