आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इला भट : चार दशकांच्या समाजसेवेचा जगानेही केला गौरव

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई/पुणे- इला भट ‘सेल्फ एम्लॉयड वुमेन्स असोसिएशन’(सेवा) या महिलांच्या सक्षमीकरणाकरिता स्थापन झालेल्या संस्थेच्या संस्थापक आहेत. इला भट यांचा जन्म 1933 साली अहमदाबाद येथे झाला. गांधीच्या विचारांचा पगडा त्यांच्यावर प्रथमपासूनच होता. वडिलांप्रमाणे त्यांनीदेखील कायद्याचे शिक्षण घेतले व ‘हिंदू लॉ’ मध्ये सुवर्णपदक मिळवून 1954 साली त्या वकील झाल्या. त्यानंतर अहमदाबादमधील ‘टेक्सटाइल लेबर असोसिएशन’मध्ये प्रवेश केला. 

 

त्या काळात टेक्सटाइल इंडस्ट्रीमध्ये महिलांचे प्रमाण अधिक होते; पण त्यांच्या उन्नतीकडे लक्ष देण्यास कोणीही नव्हते. तसेच या क्षेत्रातील स्वयंरोजगार करणाºया महिलांना तर कायद्याचेदेखील संरक्षण 
नव्हते. या महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी इला भट यांनी ‘टेक्सटाइल लेबर असोसिएशन’मध्ये काम करण्यास सुरुवात केली. 1972 साली त्यांनी प्रथम ‘सेवा’ (सेल्फ एम्लॉयड वुमेन्स असोसिएशन) ही संघटना स्थापन केली. 


इला भट यांच्या मते ही नुसती संघटना नसून एक चळवळ आहे. सत्य, अहिंसा, सर्वधर्मसमभाव आणि स्वदेशीच्या पुरस्कर्त्या असलेल्या इला भट यांनी महिलांच्या प्रगतीसाठी नवीन कायदे तयार करणे आणि प्रगतीच्या आड येणारे प्रश्न कायदेशीर मार्गाने दूर करणे याबरोबरच महिलांना सक्षम करण्यावर भर दिला. आज ‘सेवा’तर्फे महिलांसाठी बँक, आरोग्य सेवा, लहान बालकांसाठी वसतिगृह, विमा, कायदेशीर मदत, गृहनिर्माण आदी गोष्टी उपलब्ध केल्या जातात. याच संस्थेच्या अंतर्गत ‘इको टुरिझम’ ही नवीन संकल्पना 1986 साली सुरू करण्यात आली. अहमदाबादजवळ 10 एकर जागेमध्ये उत्तम प्रकारची सेवा अत्यंत माफक किमतीत पर्यटकांना उपलब्ध आहे.

 

श्री सेवा महिला सहकारी बँक 1974 मध्ये स्थापन केली. भारतातील महिलांनी महिलांसाठी चालवलेली पहिली बँक होण्याचा मान मिळवला. अशा प्रकारे दुर्बल घटकांसाठी काम करणाºया इला भट यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार, राइट लाइव्हली हूड पुरस्कार तसेच पद्मश्री, पद्मभूषण अशा पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. तसेच अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिंटन यांच्या हस्ते ‘ग्लोबल फेअरनेस इनिशिएटिव्ह अवॉर्ड’ देऊन गौरवण्यात आले आहे. 


2007 मध्ये नेल्सन मंडेला यांच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या ‘दि एल्डर्स’ या जागतिक नेत्यांच्या गटामध्येही त्यांचा समावेश करण्यात आला आहे. हा गट खास करून मानवी हक्क आणि जागतिक शांतता यासाठी काम करीत आहे. आज वयाची पंचाहत्तरी पूर्ण केलेल्या इला भट अजूनही आपले कार्य नेटाने पुढे नेत आहेत. 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती
 

बातम्या आणखी आहेत...