आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\' नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यास देशात मिनी आणीबाणी\'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - गुजरातमध्ये मोदी विरोधकांना बोलूच दिले जात नाही. लेखक, पत्रकारांना धमकावले जात आहे. गुजरात सरकार आणि कॉर्पोरेट्सनी विकासाच्या नावाखाली हैदास घातला आहे. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यास देशात आणीबाणीसदृश परिस्थिती उद्भवेल, असा गंभीर इशारा गुजराती लेखक, अर्थशास्त्रज्ञ, पत्रकार हेमंत शाह यांनी मंगळवारी दिला.
सर्वोदय मंडळाच्या वतीने गुजरातच्या विकास मॉडेलवर चर्चा आयोजित केली होती. त्यामध्ये शहा बोलत होते. नरेंद्र मोदींविरोधात गुजरातमध्ये बोलणारे बरेच आहेत. मात्र, त्यांना बोलू दिले जात नाही. धमकावले जाते, माध्यमे विकली गेली आहेत. त्यामुळे गुजरातच्या विकासाचे खोटे चित्र देशासमोर येत असल्याचे हेमंत शहा यांनी स्पष्ट केले. शहा म्हणाले, गुजरातमध्ये केवळ राज्य महामार्ग चांगले आहेत.
तालुका आणि गावरस्त्यांची दुरवस्था आहे. घरगुती वीज 24 तास आहे. मात्र, शेतकर्‍यांना रात्री-अपरात्री वीज दिली जाते. आज गुजरातेत सर्वत्र कार्पोरेट्स आणि सत्ताधारी यांनी हातमिळवणी केली आहे. मात्र, गुजरातमध्ये राज्य शासन आणि उद्योगपतींनी जितका नंगा नाच चालवला आहे, तितका जगाच्या इतिहासात कुठेही झाला नसेल, असा आरोप त्यांनी केला.
उद्योगांना सवलती
रतन टाटा यांना मोदी सरकारने 33 हजार कोटी सबसिडी दिली. अदानी उद्योगसमूहाला कच्छमध्ये बंदर उभारण्यासाठी हजारो एकर जमीन कवडीमोल किमतीत दिली असून पर्यावरणाचे मोठे उल्लंघन केल्याचा आरोप शहा यांनी केला. 2002 मध्ये गुजरातवर 45 हजार कोटींचे कर्ज होते. ते आज 1 लाख 40 हजार कोटींवर पोहोचले असून गुजरातचे विकास मॉडेल केवळ कर्ज योजनांवर अवलंबून असल्याची टीका त्यांनी केली.
शिष्यवृत्ती नाकारली
मोदी सरकारने माहिती आयुक्ताची पदे रिक्त ठेवली आहेत. ‘आरटीआय’ कार्यकर्त्यांना माहिती दिली जात नाही. 40 हजार प्राध्यापकांची पदे रिक्त आहेत. 3 हजार 125 दलित विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती नाकारण्यात आली असून पाचवीनंतर 29%, तर दहावीनंतर 47 % विद्यार्थी शाळा सोडून देतात. सरदार सरोवराचे पाणी सरकारला केवळ उद्योग आणि मोठय़ा शहरांसाठी वळवायचे आहे. शेतकर्‍यांनी पाण्याची मागणी करू नये यासाठी सरदार सरोवर लाभक्षेत्रात मोदींनी केवळ 30} कालवे निर्माणे केले, असे शहा यांनी सांगितले.
कुपोषण वाढले
कुपोषणामध्ये गुजरातचा 13 वा क्रमांक असून 44% नवजात अर्भके कुपोषित जन्मास येतात. दहा वर्षांत महिलांचा जननदर घसरला असून गुजरात राज्य शिक्षण आणि आरोग्यावर केवळ 1.9% इतका अल्प खर्च करते, असेही शहा म्हणाले.