आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Election Commission To Examine Sharad Pawar\'s Statement About Voting Twice

निवडणूक आयोगाची कृपा : गोपीनाथ मुंडे सुटले, शरद पवारांची ‘शाई’ पुसट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - मागील निवडणुकीच्या खर्चावर आठ कोटी रुपये उधळल्याच्या वक्तव्याबाबत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी खेद व्यक्त करत केलेल्या खुलाशाने निवडणूक आयोगाचे समाधान झाल्याची माहिती मुख्य निवडणूक आयुक्तांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. त्यामुळे मुंडे या प्रकरणातून सहीसलामत सुटणार असल्याचे स्पष्ट झाले. तर ‘शाई पुसून दुसर्‍यांदा मतदान करा,’ असे आवाहन करणार्‍या राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनाही मुंडेंचाच न्याय लावला जाण्याची चिन्हे आहेत.

गोपीनाथ मुंडे यांनी गेल्या निवडणुकीत आपल्याला आठ कोटींचा खर्च करावा लागला होता, असे वक्तव्य काही दिवसांपूर्वी केले होते. त्याविरोधात काही राजकीय पक्षांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. मात्र मुंडेंनी आपल्या वक्तव्याबाबत खेद व्यक्त करत केलेल्या खुलाशाने आपले समाधान झाल्याचे मुख्य निवडणूक आयुक्त व्ही. एस. संपत यांनी स्पष्ट केले. त्यामुळे मुंडे या प्रकरणातून सहीसलामत बाहेर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्याचबरोबर शरद पवार यांच्या दोनदा मतदान करण्याबाबतच्या वक्तव्याची चौकशी सुरू असल्याचेही संपत म्हणाले. शरद पवारांनीही निवडणूक आयोगाला पाठवलेल्या खुलाशात असाच खेद व्यक्त केला आहे. त्यामुळे आयोग आता त्यांनाही मुंडेंचाच ‘न्याय’ लावण्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

नागपुरात सर्वाधिक उमेदवार
महाराष्ट्रातल्या दहा मतदारसंघांत पहिल्या टप्प्यात म्हणजेच दहा एप्रिलला मतदान होत असून यात एकूण 201 उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. यापैकी नागपूरमधून सर्वाधिक 33 उमेदवार रिंगणात असून सर्वात कमी म्हणजे फक्त 7 उमेदवार अकोला मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. मतदान सुरक्षित पार पडण्यासाठी अधिकारी आणि कर्मचार्‍यांना योग्य त्या सूचना देण्यात आल्याचे संपत यांनी सांगितले. संवेदनशील भागातल्या मतदान केंद्रांवर केंद्रीय राखीव दलाच्या तुकड्या तैनात करण्यात येणार आहेत.

पेड न्यूजबाबत तक्रार करा
पेड न्यूजबाबत वाढत्या तक्रारी पाहता या वेळी निवडणुक आयोगाने प्रत्येक जिल्ह्यात एक देखरेख समिती नियुक्त केली आहे. त्याचबरोबर राज्य स्तरावरही एक समिती नियुक्त केली आहे. या समित्या 24 तास निवडणूक प्रक्रियेवर नजर ठेवतील. पेड न्यूजबाबत नागरिक अथवा राजकीय पक्षांना काही तक्रारी असल्यास ते या समित्यांकडे तक्रार करू शकतात. तसेच प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया आणि नॅशनल ब्रॉडकास्टिंग असोसिएशनकडेही तक्रार करू शकतात.

मुंबई पेड न्यूजचे हब
पेड न्यूजसंदर्भात आयोगाचे धोरण स्पष्ट करताना निवडणूक आयुक्त एच.एस.ब्रह्मा यांनी ‘मुंबई ही पेडन्यूजमध्ये देशात सर्वात पुढे आहे’ असे विधान केले. त्यांच्या या विधानाबाबत सर्वच पत्रकारांनी कडक शब्दांत नाराजी व्यक्त करताच ब्रह्मा यांनी आपले विधान मागे घेत दिलगिरी व्यक्त केलीच; पण मुख्य निवडणुक आयुक्त संपत यांनीही माफी मागितली.

सोशल मीडियावर लक्ष
मतदार नोंदणी तक्रारींबाबत संपत म्हणाले की, आतापर्यंत 16 लाख मतदारांनी ऑनलाईन अर्ज केले असून संबंधित जिल्हा निवडणुक आयुक्तांकडे ते अर्ज सोपवण्यात आले आहेत. त्यानुसार या मतदारांची नोंदणी केली जाईल. तसेच सोशल मीडियावर सुरू असलेल्या प्रचारावर निवडणुक आयोगाची नजर असल्याचे निवडणुक आयोगातर्फे स्पष्ट करण्यात आले.

आदर्श आचारसंहितेची कडक अंमलबजावणी
तीन टप्प्यांत होणार्‍या लोकसभा निवडणुकीत राज्यात आदर्श आचारसंहितेची कडक अंमलबजावणी केली जाणार असून, संबंधित जिल्ह्यातील निवडणूक कर्मचार्‍यांनाही याबाबत योग्य ते मार्गदर्शन केले आहे. कुठेही गैरप्रकार होत असल्यास निवडणूक अधिकार्‍याकडे तक्रार करावी, असे आवाहनही संपत यांनी केले.

पैसे, दारूवाटपावर विशेष लक्ष
या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान पेड न्यूज तसेच मतदारांना पैसे आणि दारूवाटपावर निवडणूक आयोगाचे विशेष लक्ष असणार आहे. याबाबतच्या सूचना देण्यासाठी काल केंद्रीय निवडणूक आयोगाने मुख्य सचिव, गृहसचिव, मुंबई पोलिस आयुक्त, सर्व जिल्हा पोलिस अधीक्षक, सर्व जिल्हाधिकारी तसेच आयकर विभागाचे अधिकारी या सर्वांची एकत्रित बैठक घेतली होती. तसेच त्यानंतर राज्यातल्या सर्व पक्षांच्या प्रतिनिधींचीही बैठक घेण्यात आली. या वेळी निवडणूक आयोगाच्या कारभाराबाबत सर्वच पक्षांनी समाधान व्यक्त केल्याचे संपत म्हणाले.

मदत वाटपात हयगय नको
गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यासाठी सरकारने जे पॅकेज जाहीर केले आहे, ती मदत शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्याकडेही विशेष लक्ष देण्याच्या सूचना जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आल्या आहेत. निवडणूक कामाच्या नावाखाली मदत वाटपात हयगय नको, असे निवडणूक आयोगाने निवडणूक कर्मचार्‍यांना सुचवले आहे.