Home | Maharashtra | Mumbai | election for 1 seat of maharashtra legislative council

विधान परिषद पोटनिवडणूक: भाजपचे प्रसाद लाड विजयी; 282 पैकी घेतली 209 मते

दिव्‍य मराठी वेब टीम | Update - Dec 08, 2017, 08:53 AM IST

दोन वर्षांपूर्वी अपक्ष म्हणून विधान परिषदेची निवडणूक लढवत असताना फक्त २ मतांनी पराभव पत्करावा लागलेल्या प्रसाद लाड

 • election for 1 seat of maharashtra legislative council

  मुंबई- दोन वर्षांपूर्वी अपक्ष म्हणून विधान परिषदेची निवडणूक लढवत असताना फक्त २ मतांनी पराभव पत्करावा लागलेल्या प्रसाद लाड यांनी या वेळी भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवत तब्बल २८२ पैकी २०९ मते मिळवून काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार दिलीप माने (७३ मते) यांच्यावर १३६ मतांनी विजय मिळवला. लाड यांच्या विजयामुळे ७८ सदस्यांच्या विधान परिषदेत भाजपचे संख्याबळ एकने वाढून १८ झाले. दरम्यान, राष्ट्रपती निवडणुकीप्रमाणे या वेळीही मते फुटल्याने काँग्रेस-राष्ट्रवादीच्या गोटात मात्र चिंतेचे वातावरण आहे. लाड यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना राज्यातून मिळालेल्या मतांपेक्षा एक मत अधिक मिळवत भाजपची ताकद वाढल्याचेच दाखवून दिले.


  नारायण राणे यांनी काँग्रेस सोडून विधान परिषदेचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेसाठी गुरुवारी मतदान झाले. राणे यांच्याऐवजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत निकटचे समजले जाणारे प्रसाद लाड यांना भाजपची उमेदवारी देण्यात आली. भाजपने २०० मतांची बेगमी केल्याची माहिती भाजपच्याच ज्येष्ठ मंत्र्याने “दिव्य मराठी’शी बोलताना दिली होती. त्यात लाड यांनी आणखी ९ मतांची बेगमी केली आणि मोठा विजय मिळवला.


  आघाडीची ९ मते फुटली
  आघाडीचे उमेदवार दिलीप माने यांना आघाडीची ८३ मते अपेक्षित असताना फक्त ७३ मते मिळाली. यात भुजबळांनी मतदान न केल्याने त्यांचे एक मत सोडले तर ९ मते सरळ-सरळ फुटल्याचे दिसून येत आहे. राष्ट्रपती निवडणुकीतही काँग्रेस-राष्ट्रवादीची मते फुटली होती तरीही मीरा कुमार यांना ७७ मते मिळाली होती. माने यांना हा आकडाही गाठता आला नाही. राष्ट्रपती निवडणुकीतही दोन मते बाद झाली होती.


  राष्ट्रपती निवडणुकीतही फुटली होती आघाडीची ६ मते
  राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीची ६ मते फुटल्याचे बोलले जात होेते. या पदासाठी भाजपचे उमेदवार रामनाथ कोविंद यांना राज्यातून भाजप-शिवसेना व अपक्षांची मिळून १९८ मते मिळण्याची अपेक्षा असताना त्यांना २०८ मिळाली होती. यात इतर पक्षांची ४ आणि काँग्रेस-राष्ट्रवादीची ६ मते असल्याचे बोलले जात होते. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या ८३ मतांपैकी आघाडीच्या उमेदवार मीरा कुमार यांना फक्त ७७ मते
  मिळाली होती.


  अपेक्षेपेक्षा २३ मते जास्त...
  > २८८ आमदारांपैकी तुरुंगात असलेले छगन भुजबळ व न्यायालयाने आमदारकी रद्द केलेले राज्यमंत्री अर्जुन खोतकर मतदान करू शकले नाहीत.
  > एमआयएमच्या २ आमदारांनी मतदानावर बहिष्कार टाकला. म्हणजे एकूण २८४ आमदारांनी मतदान केले. यातील २ मते बाद.
  > एकूण २८२ ग्राह्य मतदारांपैकी भाजपचे १२३ व शिवसेनेचे ६३ आमदार एकत्र आल्याने (१८६) प्रसाद लाड यांचा विजय निश्चित होता.
  > नितेश राणे आणि कालिदास कोळंबकर काँग्रेस उमेदवाराला मतदान करणार नाहीत हेही स्पष्ट होते. असे असतानाही ही १८६ मते मिळवण्याबरोबरच प्रसाद लाड यांनी २३ मते आणखी मिळवली.
  > अपक्षांची १० मते सोडली, तर आघाडीची ९ मते फोडल्याचे स्पष्ट.


  भाजपने १७ आयात नेत्यांना केले आमदार!
  २०१४च्या विधानसभा निवडणुकीपासून भारतीय जनता पक्षाने काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमधील १६ नेते आयात करून त्यांना आमदारकी बहाल केली. आता २१० कोटींेचे मालक असलेल्या लाड यांच्या रूपाने भाजपने १७व्या आयात नेत्याला आमदार केले. या स्पर्धेत निष्ठावंत माधव भंडारींचा पत्ता कटला होता.

  मिलिंद नार्वेकर होते लक्ष ठेवून

  या निवडणुकीत शिवसेनेच्‍या आमदारांनी क्रॉस व्‍होटींग करु नये म्‍हणून उद्धव ठाकरे यांनी त्‍यांचे पीए मिलिंद नार्वेकर यांना विधानभवनात पाठवले होते. यावर 'भाजपचे उमेदवार प्रसाद लाड यांचे पोलिंग एजंट म्‍हणून नार्वेकरांना विधानभवनात बसवल आहे. उद्धव ठाकरेंचा आपल्‍या आमदारांवर विश्‍वास नाही', असा खोचक टोला राष्‍ट्रवादीने हाणला. मात्र यामुळे नेमक्‍या कोणत्‍या आमदारांची उद्धव ठाकरे यांना धास्‍ती होती, असा प्रश्‍न विचारला जात आहे.

  नारायण राणेंमुळे निवडणूक चर्चेत

  या निवडणुकीमध्‍ये नारायण राणे यांना भाजपतर्फे तिकिट देण्‍याच्‍या शक्‍यतेवरुन सुरुवातीपासूनच भाजप आणि शिवसेनेमध्‍ये वाद पेटला होता. कोणत्‍याही परिस्थित नारायण राणेंना उमेदवारी मिळू नये, अशी शिवसेनची भूमिका होती. अखेर नारायण राणे यांना तिकिट दिल्‍यास शिवसेना काँग्रेस आणि राष्‍ट्रवादीशी हातमिळवणी करेल, या शक्‍यतेमुळे भाजपने नारायण राणेंना डावलून प्रसाद लाड यांना उमेदवारी दिली. प्रसाद लाड यांनीही 'मातोश्री'वारी करुन शिवसेनेचा पाठिंबा मिळवला.

  या आमदारांना करता आले नाही मतदान

  शिवसेनेचे अर्जुन खोतकर यांची आमदारकी उच्‍च न्‍यायालयाने रद्द केलेली असल्‍यामुळे त्‍यांना मतदानाचा अधिकार नव्‍हता. राष्‍ट्रवादीचे 2 आमदार छगन भुजबळ आणि रमेश कदम तुरुंगात असल्‍यामुळे ते मतदान करु शकले नाहीत.

  पुढील स्‍लाइडवर जाणुन घ्‍या, किती कोटी संपत्‍तीचे मालक आहेत प्रसाद लाड आणि दिलिप माने...

  हेही वाचा,
  काँग्रेसप्रमाणे भाजपही खेळवतोय नारायण राणेंना

 • election for 1 seat of maharashtra legislative council

  शिवसेनेच्‍या आमदारांनी क्रॉस व्‍होटींग करु नये म्‍हणून मिलिंद नार्वेकर विधानभवनात दाखल झाले आहेत.

 • election for 1 seat of maharashtra legislative council

  मतदान करताना मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस.

 • election for 1 seat of maharashtra legislative council

  प्रसाद लाड 200 कोटींच्या संपत्तीचे मालक-

  विधान परिषदेच्या जागेसाठी भाजपकडून अर्ज भरणारे प्रसाद लाड यांच्याकडे 210 कोटी 62 लाखांची संपत्ती आहे. अर्जासोबत दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, लाड यांच्याकडे 47 कोटी 71 लाखांची जंगम मालमत्ता आहे. यापैकी 39 कोटी 26 लाख शेअर्स व बाँडच्या स्वरूपात गुंतवले आहेत. पत्नी नीता यांच्याकडे 48 कोटी 95 लाख, मुलगी सायलीकडे 1 कोटी 15 लाख व मुलगा शुभमकडे 28 लाख 28 हजार रुपयांची जंगम मालमत्ता आहे. लाड यांच्याकडे 56 कोटी 86 लाख रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. त्यामध्ये पाथर्डी तालुक्यातील शेतजमीन, मुंबईतील सायन येथील प्लॉट, पुण्यातील एरंडवणे येथील कार्यालय, दादर येथील एक व्यावसायिक इमारत, दादरच्या कोहिनूर मिल इमारतीतील सदनिका व माटुंग्यात निवासी इमारत आहे.

  नीता यांच्याकडे 54 कोटी 94 लाखांची स्थावर संपत्ती आहे. त्यात खालापूरची शेतजमीन, माटुंगाची व्यावसायिक इमारत, चेंबूरच्या निवासी इमारतीचा समावेश आहे. लाड कुटुंबीयांकडे सामूहिक 10 कोटी 45 लाखांची स्थावर मालमत्ताही आहे. लाड वर्षाला चार कोटी 22 लाख इन्कमटॅक्स भरतात, तर त्यांची पत्नी 1 कोटी 84 लाख आयकर भरत असल्याचे त्यांनी प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे.

 • election for 1 seat of maharashtra legislative council

  काँग्रेसचे उमेदवार दिलीप माने 21 कोटींचे मालक
   विधान परिषदेच्या एका जागेसाठी काँग्रेसकडून दिलीप माने यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. उमेदवारी अर्जासोबत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार,  दिलीप माने यांच्याकडे एकूण 20 कोटी 99 लाख रुपयांची संपत्ती आहे. माने यांच्याकडे 2 कोटी 20 लाख रुपयांची जंगम मालमत्ता आहे.

 • election for 1 seat of maharashtra legislative council

  या निवडणुकीत कॉंग्रेसचे दिलिप माने व भाजपचे प्रसाद लाड यांच्‍यात सरळ लढत होती.

Trending