आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विधान परिषदेची 20 मार्चला निवडणूक, राज्यपाल नियुक्त आमदारांकडे लक्ष

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- महाराष्ट्र विधानसभेकडून विधान परिषदेवर निवडून गेलेले नऊ सदस्य येत्या 24 एप्रिलला निवृत्त होत असून, त्यासाठी येत्या 20 मार्चला निवडणूक होणार आहे. याचबरोबर राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची नियुक्ती याचवेळी होणार आहे. त्यामुळे राज्यातील 21 नेत्यांची आमदारपदावर 'राजकीय भरती' करून लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीसाठी या नव्या आमदारांना जोमाने कामाला लावणार आहे.
विधान परिषदेवर निवृत्त होणा-यात शिवसेनेच्या नीलम गोर्‍हे, भाजपचे जयप्रकाश छाजेड, विनोद तावडेंसह पांडुरंग फुंडकर, तर राष्ट्रवादीचे हेमंत टकले, किरण पावसकर, रणजितसिंग पाटील आणि कालच भाजपात डेरेदाखल झालेले संजय पाटील, काँग्रेसचे शिवाजीराव देशमुख आदी नऊ विधान परिषदेचे विद्यमान सदस्यांची सहा वर्षांची मुदत संपणार आहे.
त्यासाठीचे निवडणूक आयोगाने निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार निवडणुकीची अधिसूचना 3 मार्च 2014 रोजी जारी करण्यात येणार आहे. त्याचबरोबर अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 10 मार्च 2014 असेल.
11 मार्च रोजी अर्जांची छाननी होईल, तर, 13 मार्चपर्यंत उमेदारांना आपला अर्ज मागे घेता येतील. त्यानंतर 20 मार्च 2014 रोजी मतदान होईल.
सकाळी 9 वाजता हे मतदान सुरु होईल व सायंकाळी चार वाजता मतदान करण्याची वेळ संपेल. त्यानंतर तासाभरात मतदान मोजणीस सुरूवात होईल रात्री 9 पर्यंत निवडणूकीचा निकाल जाहीर झालेला असेल, असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे.
याचबरोबर राज्यपाल नामनिर्देशित 12 जणांना आमदार म्हणून निवडण्यात येणार आहे. यात 6 काँग्रेसचे तर 6 राष्ट्रवादीचे आमदार असतील. लोकसभा निवडणुकीच्या आधी काही इच्छुक व ताकदीच्या कार्यकर्त्यांना आमदारकी देऊन लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीच्या कामाला लावण्याचे काम सत्ताधा-यांकडून होणार आहे. दरम्यान, गट-तट पडू नयेत व लोकसभेच्या तोंडावर इच्छुकांची नाराजीची झळ पक्षाला बसू नये म्हणून लोकसभेच्या निकालानंतरच राज्यापाल नामनिर्देशित 12 आमदारांची नावे जाहीर करण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.