आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑफर्सचा पाऊस; मतदान करा सवलत मिळवा!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - सामाजिक बांधिलकीतून मतदारांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून देतानाच आपला व्यवसाय, उत्पादनांचे ब्रँडिंग करण्याची अनोखी कल्पना काहींना सुचली आहे. ‘मतदान करा, सवलत मिळवा’ अशी दिलेली हाक निवडणूक काळात औत्सुक्याचा आणि चर्चेचा विषय ठरली आहे.

मतदान हा तुमचा हक्क असून तो तुम्ही बजावलाच पाहिजे, असे सरकारी पातळीवर तसेच विविध सामाजिक संस्थांकडून सांगण्याचा प्रयत्न केला जातोय. तरीही जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारतात मतदानाची घटती टक्केवारी चिंतेचा विषय ठरत आहे. निवडणुका आणि एकूणच मतदानाबद्दलची वाढती अनास्था दूर करून मतदारांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘मतदान केल्याचा बोटावरील शाईचा पुरावा दाखवा आणि कापड खरेदीवर पाच टक्के सवलत मिळवा,’ अशी थेट कॅशबॅकची ऑफरच डोंबिवलीतील रजनीगंधा दुकानाचे मालक विपुल वैद्य यांनी दिली आहे.

बेडशीट्स, सतरंजी, गालिचे, धोतर, होजियरीचा व्यवसाय करणारे वैद्य यांच्या मतदान ऑफरचे हे तिसरे वर्ष आहे. शिवसेनेचे खासदार प्रकाश परांजपे यांच्या निधनानंतर झालेल्या लोकसभा पोटनिवडणुकीच्या वेळी त्यांना ही कल्पना सुचली. वैद्य यांनी ही पोटनिवडणूक आणि त्यानंतर झालेल्या 2009च्या विधानसभा निवडणुकीत सामाजिक बांधिलकी आणि ब्रँडिंग असा दुहेरी संगम साधला. वैद्य यांच्या सवलत योजनेचा या दोन्ही निवडणुकींत मिळून 213 ग्राहकांनी ‘कॅशबॅक’चा लाभ घेतला.

बांधिलकी अन् ब्रँडिंगही
मतदानाचे कर्तव्य पाच वर्षांत एकदाच पार पाडावे लागते, पण ते नाही केले तर उमेदवारांना दोष देण्यात काहीच अर्थ नाही. स्वयंसेवी संस्था मतदानाबद्दल जागृती करत असल्या, तरी स्वत:च्या खिशातून कोणीही पैसा काढत नाही. माझ्या या उपक्रमातून फार मोठा व्यावसायिक फायदा होतो, असे नाही; पण सामाजिक बांधिलकीतून ब्रॅँडिग होण्यास मदत होते, असे विपुल वैद्य यांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले.

एक लाखाचे बक्षीसही
चढय़ा व्याजदरामुळे घर खरेदी करणे ग्राहक टाळत आहेत. त्यावर उपाय म्हणून ‘फाइव्ह पी ग्रुप’ने वेगळी योजना जाहीर केली आहे. ‘तुमचे घर बुक करा आणि नवीन सरकार आणण्यासाठी मत द्या, जर तुम्ही मत दिलेला पक्ष जिंकला, तर एक लाख रुपये घेऊन जा किंवा 51 हजार रुपयांची हमखास बक्षिसे मिळवा’ अशी ऑफर देत ग्राहकांना आकर्षित केले.

हेअर स्टायलिंगवरही सूट
दादरमधील बंधूज हेअर स्टुडिओने हेअर स्टायलिंगवर 25 टक्क्यांची सूट दिली आहे. मतदानाची सुटी एन्जॉय न करता मतदानाचे कर्तव्य पार पाडावे या सामाजिक हेतूने ही युक्ती बंधूजने लढवली आहे. मतदान ओळखपत्र आणि बोटावरील शाईची खूण दाखवल्यानंतर 24 एप्रिलपर्यंत 20 टक्के, तर 24 एप्रिलनंतर आठवडाभर 25 टक्के सूट दिली जाणार आहे.

वाहिन्यांवर जाहिरातीतून जागृती
मतदानाची रांग. एकबनियनधारी युवक चालत येऊन मतदानाचा हक्क बजावतो, ही रूपा फ्रंटलाइनची जाहिरात. ‘तू फिट नहीं, इस समय व्होट नहीं’ असे उमेदवाराला सांगणारा डॉलर ब्रँडचा बनियनधारी युवक. योग्य वायर निवडता तसा योग्य उमेदवार निवडा, असे सांगणारी आरआर केबल वायरची जाहिरात. अगदी ‘सच ऑन करो’ सांगणारा अमिताभ बच्चनही असो, सध्या अनेक जाहिरातींमधून मतदानाचा हक्क आणि त्या अनुषंगाने उत्पादनांचा प्रचार सुरू आहे.