आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Election Voting Percentage News In Divya Marathi

टक्का वाढल्याने भाजप आनंदित;काँग्रेस,राष्ट्रवादीचा मात्र भाकितांवर विश्वास नाही

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - केवळ राज्यातच नव्हे, तर संपूर्ण देशात दोन टप्प्यात झालेल्या मतदानाची टक्केवारी चांगलीच वाढल्याचे दिसत आहे. वाढलेल्या मतदानातून सरकारविरोधी राग व्यक्त झाल्याचा अंदाज काढला जात असून त्यामुळे भाजप-शिवसेनेच्या गोटात आनंदाचे वातावरण आहे. मात्र, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते या भाकितांवर विश्वास ठेवणे योग्य नसल्याचे सांगत आहेत.

17 एप्रिल रोजी देशातील 121 जागांसाठी मतदान झाले. महाराष्ट्रातील हा दुसरा टप्पा होता. राज्यातील 19 जागांसाठी 62 टक्के मतदान झाले. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि रत्नागिरीत 2009 पेक्षा जास्त विक्रमी मतदान झाले. मतदानाची टक्केवारी वाढल्यास त्याचा फायदा विरोधी पक्षाला होतो, असे म्हटले जाते.

मोदीविरोधासाठी मते वाढली : सावंत
मतदानाची टक्केवारी ही प्रस्थापितांच्या विरोधातच असते असे नसल्याचा दावा काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे. मतदानाची टक्केवारी वाढली ती नरेंद्र मोदींना रोखण्यासाठी. हे वाढलेले मतदान सत्ताधार्‍यांच्या विरोधात नसून नरेंद्र मोदींच्या विरोधात आहे. देशातील अध्र्याहून अधिक जनतेने मोदी नको म्हणून उत्स्फूर्तपणे मतदान केले आहे. मतदानाची टक्केवारी वाढल्याने काँग्रेस आणि घटक पक्ष या वेळेस जास्त जागा जिंकेल, असा विश्वासही सावंत यांनी व्यक्त केला.

भाजपचे भाकीत चुकीचे : आव्हाड
राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले, सरकारविरोधी मतदान झाले हे भाकीत आहे. त्याची सत्यता पडताळण्याचा काहीही मार्ग नाही. मतदानाची टक्केवारी वाढल्यास सत्ता जाते हे चुकीचे आहे. 2004 पेक्षा 2009 मध्ये मतदानाची टक्केवारी वाढली होती, परंतु आमचेच सरकार आले होते. लोकांचे परसेप्शन बदलत असते. विद्वेषापेक्षा ते सर्वसमावेशक राजकारणाला पसंती देतात. त्यामुळे वाढलेले मतदान हे सत्ताधार्‍यांच्या विरोधातच असते, असे म्हणणे चुकीचे आहे.

काँग्रेसची सत्ता उलटवण्यासाठी मतदारांचा प्रतिसाद : तावडे
विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी सांगितले की, वाढलेल्या मतदानावरून स्पष्ट होते की सध्या काँग्रेस सरकारच्या विरोधात वातावरण आहे. काँग्रेसने फक्त भ्रष्टाचार केल्याने जनता त्यांना सत्तेवर पाहू इच्छित नाही. नरेंद्र मोदी यांच्या रूपाने एक सशक्त आणि देशाला प्रगतिपथावर नेणारा नेता समोर आल्याने मतदारांनी भरभरून मतदान केले आहे. त्यामुळेच राज्यातील दोन्ही टप्प्यांत चांगले मतदान झाले. याचा अर्थ स्पष्ट आहे आणि तो म्हणजे आता केंद्रात नरेंद्र मोदी यांचेच सरकार येणार. 24 तारखेला होणार्‍या राज्यातील तिसर्‍या आणि शेवटच्या टप्प्यातही मतदानाची टक्केवारी वाढलेली दिसेल असे सांगून, मतदानाची टक्केवारी वाढल्याने राज्यात आम्ही 35 चा आकडा नक्की गाठू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.