आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपच्या उमेदवारीने रामदास कदम चिंतेत, विधान परिषद निवडणूक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मुंबई स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधान परिषदेच्या दोन जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी भाजपने मनोज कोटक यांचा उमेदवारी अर्ज दाखल केल्याने ही लढत चुरशीची ठरणार आहे. शिवसेनेचे रामदास कदम हे उमेदवार असून काँग्रेसने भाई जगताप यांना उमेदवारी दिली आहे.

विधिमंडळ अधिवेशनात शिवसेना भाजपविरुद्ध आक्रमक झाली असताना भाजपने शिवसेनेची कोंडी करण्यासाठी तर ही खेळी खेळली नाही ना, अशी चर्चा सुरू झाली आहे. मुंबई भाजप अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांच्या उपस्थितीत मुंबई जिल्हाधिकारी यांच्याकडे कोटक यांनी मंगळवारी अर्ज भरला. माध्यमांशी बोलताना आशिष शेलार यांनी भाजप- शिवसेना उमेदवारांचा विजय होईल, असा दावा केला. कोटक हे मुंबई महापालिकेत भाजपचे गटनेते असून दोन वेळा मुलुंडमधून नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. तसेच २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भांडूप पश्चिम मतदारसंघातून त्यांचा ३ हजार मतांनी पराभव झाला होता.

काँग्रेसची डोकेदुखी वाढली
मुंबई महापालिकेतील नगरसेवक या निवडणुकीसाठी मतदान करतात. शिवसेनेचे ७४ नगरसेवक असल्याने कदम यांना फारशी चिंता नाही. मात्र, विधान परिषेचे मतदान हे गुप्त असते आणि यात मते फुटण्याची भीतीही असते. काँग्रेसचे भाई जगताप यांच्यासमोर विजयासाठी कडवे आव्हान असेल. काँग्रेस-राष्ट्रवादीचे मिळून ६५ नगरसेवक आहेत. भाजपचे ३१ नगरसेवक असून त्यांना मनसेच्या २८ आणि अपक्ष ९, रिपाइंचा एक अशा नगरसेवकांची मदत लाभली तर ६९ मते कोटक यांना मिळू शकतात. त्यामुळे मनसेची मते निर्णायक ठरतील.
उद्धव ठाकरेंनी केला मुख्यमंत्र्यांना फोन
मागील निवडणुकीत शिवसेनेची सहा मते फुटली होती. त्यामुळे आता भाजपच्या उमेदवारीने शिवसेना चिंतेत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यासंदर्भात फोन केला असता ‘तुमची मते फोडणार नाही’ असा शब्द फडणवीसांनी त्यांना दिल्याचे समजते. मात्र, तरीही काेटक यांच्या उमेदवारीने रामदास कदम चिंतेत असून, अधिवेशन सोडून मुंबईत तळ ठाेकणार असल्याची चर्चा अाहे.