आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यातील भारनियमन कमी होणार : मुळक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- राज्यातल्या भारनियमनाची जी कारणे होती ती दूर करण्यात यश मिळाले आहे. केंद्राकडूनही अतिरिक्त वीज घेण्यात आली आहे, त्यामुळे येत्या काही दिवसांत भारनियमन कमी होईल, अशी ग्वाही ऊर्जा राज्यमंत्री राजेंद्र मुळक यांनी मंगळवारी विधानसभेत दिली. ज्या शेतकर्‍यांनी कृषी पंपांची वीज देयके नियमित भरली असतील त्यांना भारनियमनरहित वीज देण्याबाबत निर्णय घेतला जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले. अर्थसंकल्पावरील चर्चेच्या उत्तरादरम्यान ते बोलत होते.

सध्या राज्याची सरासरी वीज मागणी ही पंधरा ते सोळा हजार मेगावॅट असून यंदा ती 17 हजार तीनशे नोंदली गेली आहे. मोठ्या प्रमाणात विजेची मागणी असताना महापारेषण आणि रिलायन्सचे राज्यभरातले 11 टॉवर्स कोसळल्याने काही भागात विजेचा तुटवडा जाणवत असल्याचे राज्यमंत्र्यांनी मान्य केले.

परिणामी राज्यात सरासरी 3 ते 9 तासांचे भारनियमन करावे लागत होते. मात्र आता वीज पुरवठ्यातल्या बर्‍याचशा त्रुटी दूर करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर केंद्राकडून 1 हजार मेगावॅट वीज विकत घेतल्याने आता राज्यातले भारनियमन येत्या काही दिवसात कमी होणार असल्याचा दावा राज्यमंत्र्यांनी केला.

मुळक यांच्या उत्तरावर समाधानी न झाल्याने विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी कृषीपंपाच्या वीज वापराची देयके नियमित भरलेल्या शेतकर्‍यांनाही भारनियमनाचा त्रास का? असा सवाल केला. तसेच उपाध्यक्ष वसंत पुरके यांनीही या प्रश्नावर 80 टक्के देयक भरलेले विभाग भारनियमन मुक्त करण्याबाबतचा जीआर रद्द करणार का? अशी विचारणा केली. त्यावर बुधवारी भारनियमनासंदर्भात एक महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली असून याबाबत लवकरच योग्य तो निर्णय घेऊ असे आश्वासन मुळक यांनी दिले.