आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Electricity Chargees Increases In State Per Unit

महावितरणचा दरवाढीचा शॉक! १६ टक्के वीज दरवाढ लागू

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- महागाईमुळे बेजार झालेल्या नागरिकांना आता महावितरणनेही दरवाढीचा जबर शॉक दिला आहे. वीज नियामक आयोगाने 1 ऑगस्टपासून वीजदरांत 16.48 टक्के वाढ करण्याच्या कंपनीच्या प्रस्तावाला मंजुरी दिली असून सुमारे 2 कोटी ग्राहकांवर हा भुर्दंड पडणार आहे.
वीज खरेदीवर वाढत चाललेला खर्च तसेच इंधन दरवाढीचे कारण पुढे करून महावितरणने 17.68 टक्के दरवाढीचा प्रस्ताव आयोगाकडे दिला होता. मात्र 16.48 टक्के वाढीस आयोगाने मुंजरी दिली. वाढता उत्पादन खर्च आणि तूट पाहता दरवाढ अपरिहार्य असल्याचे कंपनीने प्रस्तावात म्हटले होते.
महावितरणला नव्या दरवाढीतून सुमारे 6 हजार 921 कोटी रुपयांचा अतिरिक्त महसूल मिळणार आहे. यापैकी 1483 कोटी रुपयांच्या वसुलीला आयोगाने यापूर्वीच परवानगी दिली होती. कंपनीने 50 हजार 750 कोटी रुपयांचे महसुली अंदाजपत्रक सादर करताना सरासरी 17.68 टक्क्यांची दरवाढ करण्यास परवानगी मागितली होती. मात्र 16.48 टक्के दरवाढीला मिळाली. चालू आर्थिक वर्षात महावितरणला 7 हजार 623 कोटी रुपयांची तूट सहन करावी लागणार आहे. ती भरून काढण्यासाठी कंपनीने दरवाढीचा प्रस्ताव दिला होता.
'पब्लिक सर्व्हिसेस'नवा वर्ग : कमी व उच्च दाबाने वीजवापर करणार्‍या ग्राहकांतील 'पब्लिक सर्व्हिसेस' असा नवा वर्ग निर्माण करण्यात आला असून त्यांच्यासाठी 7.16 रुपये प्रति युनिट वीज शुल्क आकारले जाईल. यात रुग्णालये, शैक्षणिक संस्था, संरक्षण सेवेतील आस्थापना, पोलिस ठाणी, पोष्ट, सार्वजनिक ग्रंथालये, कोर्ट आणि विमानतळे यांचा समावेश आहे.
स्थिर आकार वाढला
- बीपीएल ग्राहकांना पूर्वीच्या 3 ऐवजी 10 रुपये प्रति महिना फिक्सड् चार्ज द्यावा लागेल. मात्र, वीज आकार 0.89 वरून 0.76 पैसे करण्यात आला आहे.
- सिंगल फेज निवासी ग्राहकांसाठी स्थिर आकार 30 ऐवजी 40 रुपये, तर थ्री फेजसाठी 100 रुपयांऐवजी आता 130 रुपये द्यावे लागतील.
युनिट नवे दर पूर्वीचे दर
0-100 3.36 रु. (2.82)
100-300 6.05 रु. (5.00)
301-500 7.92 रु. (7.15)
501-1000 8.78 रु. (8.29)
1000 व पुढे 9.50 रु. (8.55)
कृषी : किंचित वाढ
पूर्वीच्या 2.33 ऐवजी कृषी ग्राहकांना युनिटसाठी 2.45 रु. मोजावे लागतील.
मीटर दिलेले नाहीत अशांना 2.22 ऐवजी 2.45 रुपये युनिटमागे द्यावे लागतील.
छोट्या व्यावसायिक ग्राहकांना फायदा
- 300 युनिटपेक्षा कमी वापर करणार्‍या उद्योग, व्यावसायांना निवासी दरानेच वीज शुल्क आकारले जाईल.
- याचा फायदा 3.5 लाख छोट्या व्यावसायिकांना होईल.
महागाईचे चटके सोसणार्‍या जनतेला महावितरणचा दरवाढीचा शॉक!