आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Electricity Chargees Increases In State Per Unit

दरवाढीला आव्हान देणार : वीज ग्राहक संघटना लवादाकडे जाणार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- महावितरण कंपनीस 16.38 टक्के वीजदरवाढ करण्यास वीज नियामक आयोगाने दिलेल्या परवानगीच्या विरोधात महाराष्ट्र वीज ग्राहक संघटना ‘अपिलेट ट्रायब्युनल आॅफ इलेक्ट्रिसीटी’कडे दाद मागणार असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष आणि जनता दलाचे नेते प्रताप होगाडे यांनी शुक्रवारी दिली.
होगाडे म्हणाले की, महावितरण कंपनीस चालू आर्थिक वर्षात 7 हजार 623 कोटी रुपयांची तूट आली आहे. त्याच्या वसुलीसाठी वीज दरवाढीची परवानगी महावितरण कंपनीने वीज नियामक आयोगाकडे मागितली होती. आयोगाने महावितरण कंपनीस 6 हजार 921 कोटी रुपये वसुल करण्यासाठी 16.38 टक्के दरवाढ करण्यास गुरुवारी परवानगी दिली. परंतु इंधन समायोजनाची तूट भरून काढण्यासाठी आयोगाने जूनमध्येच 1 हजार 483 कोटींच्या वसुलीस परवानगी दिली होती. त्यामुळे यंदाची एकूण वीज दरवाढ 8 हजार 408 कोटींवर म्हणजेच (19.5 टक्के) पोहोचली असून महावितरण कंपनीने केलेल्या मागणीपेक्षा आयोगाने दिलेली दरवाढ अधिक असल्याचा आरोप होगाडे यांनी केला.
कृषी पंपाची वीज महागली- कृषी पंपासाठी 3 एचपी (500 रु.), 5 एचपी (700 रु.) 5 एचपीच्या पुढे (900 रु.) प्रतिमाह शुल्क आकारणी करण्यात येते. मीटर असलेल्या कृषी पंपांना 50 पैसे प्रतियुनिट तर उपसा सिंचन योजनांसाठी 30 पैसे प्रतियुनिट वीजदर सध्या आकारले जातात. वीज नियामक आयोगाने वीज दरवाढीस दिलेल्या परवानगीमुळे कृषी पंपाची वीजही महागली आहे. 3 एचपीच्या पंपधारकांना यापुढे प्रतिमाह 43 तर 5 एचपीच्या पुढील पंपमालकांच्या मासिक बिलामध्ये 52 रुपयांनी वाढ होणार आहे. कृषी पंपाच्या विजेची दरवाढ केली असली तरी वाढलेल्या दराचा बोजा राज्य शासन उचलते. 500, 700 आणि 900 रुपये असे कृषी पंपांसाठीचे वीज दर निश्चित असून वाढलेली रक्कम राज्य शासन सबसिडीच्या रूपाने महावितरण कंपनीस देते.
ग्राहकांनी न्यायालयात दाद मागावी- वीज नियामक आयोगाने गेल्या 13 वर्षांमध्ये पहिल्यांदाच इतक्या मोठ्या फरकाने दरवाढ केली असून ती महावितरण आणि राज्य शासनासाठी सोईस्कर आहे. वीज ग्राहक आणि वीज ग्राहक संघटनांनी या दरवाढीच्या विरोधात न्यायालयात दाद मागावी तसेच महावितरणच्या विरोधात निदर्शने करायला हवीत, असे आवाहन प्रताप होगाडे यांनी केले.
महावितरणचे कारण दिशाभूल करणारेच- वीज दरवाढ करण्याची मागणी नियामक आयोगाकडे करताना महावितरण कंपनीने वीज खरेदीचा खर्च वाढला असल्याचे कारण नमूद केले होते. कंपनीने दिलेले कारण दिशाभूल करणारे असल्याचा आरोप होगाडे यांनी केला आहे. मागील वर्षी कंपनी 295 पैसे प्रती युनिटने वीज खरेदी करत होती. चालू वर्षात हाच दर 339 पैसे आहे. त्यामुळे वीज खरेदी दर वाढला असल्याचे कंपनीचे कारण योग्य नाही. महावितरण कंपनीने केवळ वीजदरात वाढ केली नसून वीज जोडणी, मीटर तपासणी, छाननी शुल्काच्या दरात दुप्पट वाढ केल्याचे होगाडे यांनी सांगितले.