आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकऱ्यांना वीज देण्यात अनेक तांत्रिक अडचणी; भाजपचे प्रवक्त्यांची कबूली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- पिकांसाठी पाणी देता यावे, यासाठी विदर्भ, मराठवाड्यातील शेतकऱ्यांना दिवसा १२ तास वीज देण्याचा निर्णय दोन दिवसांपूर्वीच मुख्यमंत्र्यांनी घेतला हाेता. मात्र वीजपुरवठा करण्यात काही तांत्रिक अडचणी असून त्या दूर केल्यानंतरच १२ तास वीज दिली जाईल, अशी माहिती भाजपचे प्रदेश प्रवक्ते विश्वास पाठक यांनी गुरुवारी दिली. १२ तास वीज पुरवण्यासाठी एमईआरसीची परवानगी मिळण्याचा प्रस्ताव पाठवल्याचेही त्यांनी सांगितले.

पाठक म्हणाले, ‘सध्या वीज वितरणाची जी पद्धत वापरली जात आहे ती वेगळी आहे. उदाहरणच द्यायचे झाल्यास, विमानतळावरील एकच रनवे असल्याने देशांतर्गत हवाई वाहतूक दिवसा आणि आंतरराष्ट्रीय वाहतूक रात्री केली जाते. त्याच प्रकारे उद्योगांना दिवसा आणि शेतकऱ्यांना रात्री वीज सध्या दिली जाते. असे तांत्रिक नियोजन असल्यामुळे शेतकऱ्यांना दिवसा वीज देणे सध्या अवघड आहे. मात्र खुद्द मुख्यमंत्र्यांनीच अाता तसे निर्देश दिल्यामुळे शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. कोणत्या भागात कधी विजेची आवश्यकता भासणार आहे याचे सर्वेक्षण करण्यात येत असून ते लवकरच पूर्ण होईल,’ अशी माहितीही पाठक यांनी दिली.

साैरऊर्जेला प्राधान्य
‘काही पिकांना रात्री पाणी द्यावे लागते, तर काहींना दिवसा द्यावे लागते. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांची मागणी पाहून त्यांना दिवसा आणि रात्री वीज दिली जाईल. दिवसभरात १२ तास वीज उपलब्ध करण्यात येत असली तरी शेतकरी संपूर्ण १२ तास वीज वापरत नाहीत.

शेतकऱ्यांना दिवसा वीज दिल्यास उद्योगांना समस्या निर्माण होणार आहे. मात्र यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. शेतकऱ्यांना दिवसा वीज प्राप्त व्हावी म्हणूनच सौरऊर्जेद्वारे विजेची उत्पादनाची योजना आखण्यात आली आहे,’ असे पाठक म्हणाले.
बातम्या आणखी आहेत...