आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

इलेक्ट्रॉनिक्स टायमरचा वापर केल्याचे निष्पन्न

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- पुण्यात बुधवारी रात्री झालेल्या साखळी स्फोटांमागे कोणाचा हात आहे तसेच हा हल्ला अतिरेकी संघटनांकडून करण्यात आला याचा तपास सुरू असून पोलिस कोणतीही शक्यता नजरेआड न करता तपास करीत आहेत, अशी माहिती गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी गुरुवारी मुंबईत दिली. या स्फोटासाठी अमोनियम नायट्रेट व इलेक्ट्रॉनिक्स टायमरचा वापर करण्यात आला असून सहापैकी केवळ चारच बॉम्ब फुटल्याचे त्यांनी सांगितले.
अमोनियम नायट्रेटच्या पावडरचे मिश्रण व्यवस्थित न झाल्याने या स्फोटाची तीव्रता कमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबत असे सांगितले जात आहे की, बॉम्ब बनवतांना अमोनियम नायट्रेटबरोबर डिटोनेटर लावण्यात आले. पण स्फोट झाले तेव्हा फक्त डिटोनेटर फुटले मात्र अमोनियम नायट्रेटच्या पावडरचा स्फोट झाला नाही. याबाबत शास्त्रीय माहिती अशी पुढे आली आहे की, अनोनियम नायट्रेट पाण्यात विरघळते. मात्र त्या सायंकाळी पुण्यात हलकासा पाऊस होता. सायंकाळी हलक्या सरी पडल्यामुळे अनोनियम नायट्रेटचे पाणी झाले असावे, यामुळे अनोनियम नायट्रेटच्या पावडरचा स्फोट झाला नसावा, अशी शक्यता आहे. यावरुन साखळी बॉम्बस्फोट घडवून, मोठी जीवितहाणी करण्याचे दहशतवाद्याचे लक्ष होते, हे यावरुन स्पष्ट होते आहे. त्यामुळे मोठा विध्वंस व जीवितहाणी टळली असल्याचे सांगण्यात येत आहे.
पुण्यातील बॉम्बस्फोटांच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्र्यांनी गुरुवारी मुंबईत वरिष्ठ पोलीस अधिका-यांची बैठक घेतली. त्यानंतर पत्रकार परिषदेत ते म्हणाले, की या स्फोटांच्या तपासासाठी एटीएस आणि पुणे पोलिसांच्या संयुक्त पथकाची नेमणूक केली आहे. तसेच एनआयए ही केंद्रीय तपास यंत्रणाही तपास करीत आहे.
तपास यंत्रणांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार चारही बॉम्स्फोटासाठी अमोनियम नायट्रेट वापरण्यात आल्याचे दिसत असले तरी अन्य स्फोटकांचा वापर करण्यात आला होता का याची न्यायवैद्यक प्रयोगशाळेत तपासणी करण्यात येत आहे. सहापैकी दोन बॉम्ब निकामी करण्यात पोलिसांना यश आले आहे. या बॉम्बस्फोटासाठी इलेक्ट्रॉनिक टायमर लावण्यात आले होते. त्यातील डिटोनेटर्सचा स्फोट झाला असला तरी वापरण्यात आलेल्या सर्वच साहित्याचा स्फोट झाला नसल्याचे पाटील यांनी सांगितल्याने कदाचित त्यामुळे स्फोटाची तीव्रता कमी असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
सीसीटीव्ही फुटेज ताब्यात- स्फोट घडलेल्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यातून काही चांगली माहिती हाती लागण्याची शक्यता असून फुटेज तपासणीचा अहवाल अद्याप मिळाला नसल्याचे पाटील यांनी सांगितले. या स्फोटात जखमी झालेला टेलर दयानंद पाटील याची प्रकृती आता सुधारत असून त्याच्याकडे बॉम्ब कसा आला याचीही चौकशी केली जाईल. या स्फोटांच्या मागे कोणत्या शक्तींचा हात आहे याचे धागेदोरे लवकरच सापडतील, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला. या बैठकीला गृहराज्यमंत्री सतेज पाटील, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव अमिताभ राजन, मुंबईचे पोलिस आयुक्त अरूप पटनायक, हिमांशू रॉय, के. एल. प्रसाद, नवल बजाज उपस्थित होते.
राज्यभर अतिदक्षता- पुण्यातील स्फोटांनंतर राज्यात सर्वत्र अतिदक्षतेचा इशारा देण्यात आल्याचे गृहमंत्र्यांनी सांगितले. सर्व वाहनांची तपासणी, संशयितांचे तपासणी आणि बेवारस वस्तूंबाबत सावधानता बाळगण्याचे आदेश दिले असून लोकांनीही जागरूकता पाळायला हवी. दहिहंडीसारखे उत्सव जवळ आले असले तरी सर्वत्र पुरेसा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येत आहे. तसेच घातपाती कारवाया रोखण्यासाठी मनुष्यबळ वाढवणे, गुप्तहेर यंत्रणा सक्षम करणे तसेच सीसीटीव्हीची संख्या वाढवणे यासारखे उपाय योजले जात असल्याचे पाटील म्हणाले.
निनावी पत्राची दखल- काही दिवसांपूर्वी पुणे पोलिसांना मराठीत लिहिलेले एक निनावी पत्र आले होते. त्यात येरवडा येथील अटकेत असलेला कैदी कतील याच्या हत्येचा बदला घेण्यासाठी घातपात घडवण्याची धमकी देण्यात आली होती. त्याचा या घटनेशी काही संबंध आहे का, याची चौकशी केली जाईल, असेही गृहमंत्री पाटील यांनी सांगितले.
पुणे स्फोटातील जखमी पाटीलसह सहा ताब्यात