आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘कमबॅक’ साजरे करण्यासाठी वादग्रस्त अधिकारी शर्माने कासकर प्रकरणाचे केले भांडवल!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- ठाणे पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने मुंबई आयुक्तालय क्षेत्रात येऊन इक्बाल कासकरला केलेल्या अटकेमुळे ठाणे आणि मुंबई पोलिसांमधील दुरावा वाढला आहे. कासकरकडून कोणतीही नवी माहिती मिळालेली नसतानाही निव्वळ आपले ‘कमबॅक’ साजरे करण्यासाठी एका वादग्रस्त अधिकाऱ्याने कासकर प्रकरणाचे भांडवल केल्याबाबत मुंबई पोलिस दलातील वरिष्ठ वर्तुळात नाराजीची भावना आहे. सूत्रांंनी दिलेल्या माहितीनुसार, हा सर्व प्रकार मुंबई पोलिसांद्वारे मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालण्यात आला आहे. त्यातच या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसला जाणीवपूर्वक बदनाम केल्याचा दावा करत शरद पवार हेदेखील मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याने या प्रकरणाला वेगळे वळण मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.    

गेल्या महिन्यात ठाणे पोलिसांनी इक्बाल कासकरला अटक केली. अटकेनंतर ठाणे पोलिसांद्वारे दररोज कासकरच्या चौकशीतून मिळालेली माहिती माध्यमांना दिली गेली. मात्र, त्यात नवे काहीच नसून २००३ मध्ये भारतात पहिल्यांदा अटक झाल्यानंतर इक्बालने हीच माहिती दिल्याचा दावा मुंबई पोलिसांद्वारे करण्यात येत आहे. कासकरविरोधात कारवाई करत खळबळजनक माहिती मिळत असल्याचे चित्र जाणीवपूर्वक उभे केले जात असल्याने मुंबई पोलिस अस्वस्थ आहेत. अटकेमुळे कासकरचाच अप्रत्यक्ष फायदा होईल, अशीही एक थिअरी मुंबई पोलिस दलातील काही वरिष्ठ पोलिस अधिकारी मांडत आहेत.

शरद पवारही घेणार मुख्यमंत्र्यांची भेट   
कासकरच्या अटकेनंतरच्या चौकशीवर आता शरद पवार यांनीही प्रश्न उपस्थित केले आहेत. पोलिस सेवेतून सात वर्षांसाठी निलंबित झालेला आणि काही काळ तुरुंगाची हवा खाऊन आलेला अधिकारी कासकरविरोधात मोठी कारवाई केल्याचा आव आणत राष्ट्रवादी काँग्रेसला नाहक बदनाम करत असल्याचा थेट आरोप पवारांनी केला आहे. तसेच मुंबई पोलिस चांगले काम करत असल्याचे प्रशस्तिपत्रक देत, ठाणे पोलिसांच्या या भूमिकेबाबत लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे पवारांनी सांगितले आहे. त्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
बातम्या आणखी आहेत...