मुंबई- महाराष्ट्रातून काँग्रेसचे एन्काऊंटर करण्यासाठी 'एन्काऊंटर स्पेशलिस्ट' रविंद्र आंग्रेंना भाजपात प्रवेश दिल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी म्हटले आहे. राज्य पोलिस दलात एन्काऊंटर स्पेशलिस्ट अशी ओळख राहिलेल्या व मुंबईसह ठाणे परिसरात तब्बल 54 गुंडांचा खात्मा केलेले माजी पोलिस अधिकारी रविंद्रनाथ आंग्रे यांनी दानवे यांच्या उपस्थितीत आज भाजपात प्रवेश केला. पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या कार्यामुळे प्रभावित होऊन भाजपात प्रवेश करीत असल्याचे आंग्रे यांनी सांगितले. त्यावेळी दानवे बोलत होते.
दानवे म्हणाले, पोलिस दलात असताना आंग्रे यांनी समाजाला त्रासदायक ठरणा-या गुंडांचा खात्मा केला. आता ते भाजपमध्ये प्रवेश करीत आहेत. आम्ही त्यांच्याकडे काँग्रेसचे एन्काऊंटर करण्याचे काम देणार आहोत व आंग्रे ते काम चोखपणे बजावतील असे वक्तव्य केले. दरम्यान, काँग्रेस पक्षाचा खात्मा करण्याची भाषा केल्याने दावनेंवर विविध स्तरातून टीका होण्याची शक्यता आहे. काँग्रेसने याबाबत अद्याप प्रतिक्रिया दिली नाही. त्यामुळे काँग्रेस याबाबत काय प्रतिक्रिया देते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
आंग्रेंनी 14 महिने तुरुंगावास भोगला- रविंद्र आंग्रे हे राज्य पोलिस दलातील प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व राहिले आहे. आंग्रे यांनी पोलिस दलात असताना तब्बल 54 गुंडांचा खात्मा केला. त्यामुळेच गुंडांचा कर्दनकाळ म्हणून ओखळल्या जाणा-या आंग्रे यांनी मुंबई-ठाण्यातील गुन्हेगारी मोडून काढण्याचे काम केले. ठाण्यातील कुख्यात गँगस्टर सुरेश मंचेकरसह त्याची टोळी संपविण्याचे कामही आंग्रे यांनीच केले. बनावट एन्काऊंटरचे आरोप आणि एका बिल्डराने केलेल्या खंडणी वसुलीच्या तक्रारीनंतर आंग्रे यांना पोलिस दलातून निलंबित करण्यात आले होते. याप्रकरणी त्यांना 14 महिन्यांचा तुरूंगवासही भोगावा लागला होता. मात्र, त्यानंतर कोर्टाने पुराव्याअभावी त्यांची निर्दोष मुक्तता केली होती. त्यामुळे चकमकफेम म्हणून प्रसिद्धीस आलेले आंग्रे यांनी राजकीय वळचळीला जाण्याचा निर्णय घेतला आहे. मागील काही महिन्यांपासून ते भाजपच्या नेत्यांच्या संपर्कात होते. अखेर त्यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
पुढे आणखी वाचा, रविंद्र आंग्रे यांच्याविषयी...