आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यातील सुमारे एक लाख विद्यार्थ्यांना व्हायचंय इंजिनिअर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - राज्यात तिसर्‍या आठवड्यात सुरू झालेल्या अभियांत्रिकी पदवी प्रवेशाची पहिली तात्पुरती गुणवत्ता यादी शनिवार, 5 जुलै रोजी जाहीर होत आहे. राज्यात अभियांत्रिकीच्या विविध अभ्यासक्रमांसाठी 23 जून पासून ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून आतापर्यंत 1 लाख 6 हजार 833 विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज दाखल केले आहेत.

अभियांत्रिकी प्रवेशासाठी राज्यातून 75 हजार 873 विद्यार्थ्यांनी तर, 30 हजार 960 विद्यार्थिनींनी प्रवेशासाठी अर्ज केल्याची माहिती तंत्रशिक्षण संचालनालयाकडून शुक्रवारी देण्यात आली. शनिवारी लागणार्‍या तात्पुरत्या यादीतूनही विद्यार्थ्यांना आपल्या पसंतीच्या महाविद्यालयातील प्रवेशाची माहिती मिळेल. त्यामुळे या यादीकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
अभियांत्रिकीची पहिली तात्पुरती गुणवत्ता यादी शनिवारी जाहीर होईल. यात विद्यार्थी, ऑनलाइन प्रवेश केंद्रे आदींमध्ये झालेल्या त्रुटी दुरुस्त करण्यात येतील. त्यानंतर परिपूर्ण यादी 9 जुलै रोजी सायं. 5 वाजता तंत्रशिक्षण संचालनालयाच्या संकेतस्थळावर झळकणार आहे.

राज्यात अभियांत्रिकी पदवीची अनुदानित, विनाअनुदानित, सरकारी अशी एकूण 366 महाविद्यालये आहेत. त्यात 1 लाख 55 हजारहून अधिक जागा आहेत. यंदा 15 नवीन अभियांत्रिकी महाविद्यालयांना मान्यता मिळाली आहे. त्यामुळे चार हजार जागा वाढल्या आहेत. ऑनलाइन प्रवेशासाठी अखेरच्या दिवशी 1 लाख 6 हजार 833 विद्यार्थ्यांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यामुळे यंदाही अभियांत्रिकीच्या किमान 50 हजार जागा रिक्त राहण्याची शक्यता आहे.