मुंबई- हैदराबादची 23 वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनीअर इस्थर अनुह्या हिच्या हत्येचे गूढ उकलण्यात मुंबई पोलिसांना दोन महिन्यानंतर यश आल्याचा दावा करण्यात आला आहे. खब-याने दिलेल्या माहितीनंतर सीसीटीव्हीत इस्थरसोबत असलेल्या पुरुषापर्यंत पोलिस अखेर पोहोचलेच. चंद्रभान सानप असे संशयित आरोपीचे नाव असून त्याला नाशिकजवळून ताब्यात घेतल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. मुंबई पोलिस याबाबत लवकरच एक पत्रकार परिषद घेऊन इस्थरच्या मारेक-याला पकडल्याचे जाहीर करणार आहेत. पोलिस सध्या सानप याचे इंन्ट्रोगेशन करीत आहेत.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्रभान सानप त्या दिवशी दारू पिऊन रिक्षा चालवत होता. तसेच इस्थरला तो रिक्षातून घेऊन जाणार होता. चंद्रभानने इस्थरला रेल्वे स्थानकातच हटकले व रिक्षात बसण्यास सांगितले. त्याने तिची बॅग घेऊन ते तिला स्थानकाबाहेर पडला. मात्र, जाताना रस्त्यात तो तिला अनोळखी ठिकाणी घेऊन गेला व तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न केला. त्याने तिला विरोध केला व त्यातूनच तिची गळा दाबून हत्या केल्याची माहिती पुढे येत आहे. मात्र सानपने इस्थरवर बलात्कार केला की नाही याबाबत तो अजून बोलता झालेला नाही.
4 जानेवारीच्या सकाळी कुर्ला रेल्वे टर्मिनसमधील फलाट क्रमांक 5 वर अनुयासोबत एक व्यक्ती असल्याचे सीसीटीव्हीत दिसून आले होते. अंदाजे 40 वर्षवयोगटातील एक व्यक्ती अनुह्याची बॅग घेऊन तिच्यासोबत चालत असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे पोलिसांच्या एका टीमने या व्यक्तीबाबत चौकशी सुरु केली होती. तसेच ही व्यक्ती कोण यावर चौकशीचा केंद्र ठेवला होता. प्रीती राठी अॅसिड हल्लाप्रकरणीही आरोपीचा तपास हीच टीम करीत होती. अखेर राठी प्रकरणापाठोपाठ इस्थर अनुह्या हत्या प्रकरणाचे गूढ उकलण्यात त्यांना यश आल्याचे मानण्यात येत आहे.
4 जानेवारीपासून बेपत्ता असलेल्या या सॉफ्टवेअर इंजिनिअर युवतीचा 16 जानेवारी रोजी सायंकाळी ईस्टर्न एक्स्प्रेस वेजवळील मिठागारात सापडला होता. हा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडला होता व तो जाळून टाकण्यात आला होता. अनुह्या आपल्या मूळगावी आंध्र प्रदेशातील मछलीपट्टणम येथे नाताळाच्या सुटीसाठी गेली होती. मात्र सुटीवरून परतत असताना कुर्ला स्थानकात उतरल्यानंतर ती बेपत्ता झाली होती. लुटमार करून तिची कोणी हत्या करण्यात आली असावी, असा संशय पोलिसांनी व्यक्त करीत त्या दिशेने तपास सुरू केला होता. मात्र आता सीसीटीव्हीत तिच्यासोबत एक इसम तिची बॅग हातात घेऊन जाताना दिसत होता. त्यामुळे अनुयाच्या हत्येला तो इसमच जबाबदार असला पाहिजे असे गृहित धरून पोलिसांनी त्या इसमाला शोधण्याची मोहिम सुरु केली व अखेर दोन महिन्यांनतर याचे गूढ उकलले आहे.
इस्थर अनुह्या हत्याप्रकरणाची माहिती आणखी पुढे वाचा...