मुंबई- राज्यातील पाऊस हा मान्सूनचा पाऊस असतो, हवामानात सतत बदल होत असतात त्यामुळे अंदाज चुकतात. अंदाज चुकण्याची गेल्या अनेक वर्षांपासूनची ‘परंपरा’ कायम आहे. सरकार आता राज्यात दोन हजारच्या वर स्वयंचलित हवामान केंद्रे उभारत असल्याने आता पुढील वर्षीपासून शेतकऱ्यांना हवामानाचा अचूक अंदाज मिळेल आणि शेतकऱ्यांचे बेभरवशी पावसामुळे होणारे नुकसान टळेल, असे कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले.
हवामान खात्याने यंदा चांगला पाऊस होईल, असे घोषित केले होते. त्यानुसार पहिल्या पावसानंतर शेतकऱ्यांनी पेरणी केली. परंतु त्यानंतर जवळ-जवळ २२ दिवस पाऊस न पडल्याने शेतकऱ्यांची पेरणी वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली होती. शुक्रवारपासून पुन्हा पावसाला सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांवरील दुबार पेरणीचे संकट टळले आहे. हवामान खात्याच्या चुकीच्या अंदाजाने त्रस्त झालेल्या शेतकऱ्याने हवामान खात्याविरोधात तक्रार नोंदवली आहे.
याबाबत फुंडकर म्हणाले की,‘हवामान खात्याच्या विरोधात तक्रार करून काहीही उपयोग नाही. उपकरणे जी माहिती देतात त्यानुसार हवामान खाते आपले अंदाज व्यक्त करते. हवामान खात्याचा अंदाज हा हवेच्या दाबाचा पट्टा आणि वारे यावर अवलंबून असतो. यात जराही बदल झाला तर अंदाज चुकतात. हे पहिल्यांदाच घडले आहे असे नाही. आपण हवामान खाते अत्याधुनिक करण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्यासाठीच राज्यात स्वयंचलित हवामान केंद्रे तयार केली जात आहेत. सप्टेंबरपर्यंत दोन हजारच्या आसपास ही हवामान केंद्रे बसवली जाणार असून पुढील वर्षी शेतकऱ्यांना हवामानाचा अचूक अंदाज मिळेल.’
शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली परंतु त्यांचे सातबारा अजून कोरे झाले नाहीत, कधी होणार असे विचारता कृषिमंत्री फुंडकर म्हणाले, ‘जिल्हा बँकांनी खातेधारकांची माहिती दिली आहे परंतु राष्ट्रीयीकृत बँकांनी अजूनही माहिती दिलेली नाही. माहिती संकलित करण्यास वेळ लागत आहे. तसेच कर्जाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर टाकायची की थेट बँकेला जायची याबाबतही विचार सुरू आहे. सरकारने सातबारा कोरा करण्याची सर्व तयारी केली असून आकडेवारी आली की शेतकऱ्यांचे कर्ज माफ होईल.’
कशी आहे स्वयंचलित हवामान यंत्रणा
महावेध प्रकल्पांतर्गत कृषी विभागामार्फत स्वयंचलित हवामान केंद्र तयार केले जात आहे. राज्य शासन आणि स्कायमेट वेदर सर्व्हिसेस प्रा.लि. यांच्या खासगी भागीदारीतून उभारण्यात येणाऱ्या या स्वयंचलित हवामान केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पाऊस, हवेची दिशा, हवेची गती, तापमान व आर्द्रता यांची प्रत्येक तासागणिक माहिती मिळणार आहे.