आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आठवडाभरात दहीहंडीबाबत धोरणाबाबत स्पष्टीकरण द्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - राज्य सरकारने नुकताच दहीहंडी या खेळाला जरी साहसी खेळाचा दर्जा असला तरी उत्सवाबाबत त्याच्या नियमांबाबत संभ्रम कायम असल्याने गोविंदा पथके आणि आयोजकांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच येत्या आठवड्याभरात राज्य सरकारने या खेळाच्या धोरणाबाबत आपली भूमिका स्पष्ट न केल्यास मुंबई आणि ठाण्याच्या नामवंत गोविंदा पथकांसोबत उत्सव आयोजकांनीही आंदोलनाचा इशाराही राज्य सरकारला दिला आहे.

दोनच दिवसांपूर्वी राज्याचे सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे यांनी दहीहंडीला साहसी खेळाचा दर्जा दिल्याची घोषणा मुंबईत केली. मात्र, दहीहंडीच्या उंचीबाबतची स्पष्टता, थरांची मर्यादा किती, गोविंदांच्या सुरक्षेसंदर्भातल्या नियमावलीतील अनिश्चितता, आयोजकांसंदर्भातील नियम काय आहेत, अशा कोणत्याही गोष्टींची स्पष्टता अद्यापही सांस्कृतिक विभागाच्या वतीने करण्यात आलेली नाही. त्यामुळे ऐन सणाच्या तोंडावर आयोजक आणि गोविंदा पथकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. यातून मार्ग कसा काढावा याबाबतची रणनीती ठरवण्यासाठी शनिवारी एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यात दहीहंडी समन्वय समितीचे पदाधिकारी, मुंबई ठाण्यातील गोविंदा पथकांचे प्रतिनिधी आणि उत्सवाच्या आयोजकांसोबतच काही राजकीय पक्षांचे पदाधिकारी
उपस्थित होते. या बैठकीत सरकारच्या भूमिकेबाबत तीव्र नापसंती व्यक्त करण्यात आली.
तसेच याबाबत सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी तसेच या खेळाबाबतचे धोरण स्पष्ट करावे यासाठी सरकारला एका आठवड्याची मुदत देण्यात आली अाहे. अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरून संघर्ष करावा लागेल, अशी भूमिका वरळी येथील प्रसिद्ध ‘संकल्प' या दहीहंडी उत्सवाचे आयोजक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी घेतली, तर ठाण्यातील "संघर्ष' दहीहंडीचे आयोजक व राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही सरकारच्या धोरणाचा निषेध करत गिर्यारोहण करतानाही अनेक गिर्यारोहकांचा मृत्यू झाला म्हणून आता सरकार गिर्यारोहणावरही बंदी घालणार का, असा सवाल केला. ज्या धर्म आणि सणांचा वापर करत भाजपचे हे सरकार सत्तेवर आले तेच सण बंद करण्याचा या सरकारचा डाव असल्याचेही अाव्हाड म्हणाले.
आज ठरणार आंदोलनाची रणनीती
या अगोदर दहीहंडी समन्वय समितीतर्फे सरकारचा निषेध म्हणून १५ ऑगस्ट रोजी मुंबईच्या हुतात्मा स्मारकासमोर मानवी थर लावून निषेध आंदोलन करण्यात येणार होते. मात्र, सुरक्षेच्या कारणामुळे मुंबई पोलिसांनी या आंदोलनाला परवानगी नाकारल्याने हे आंदोलन पुढे ढकलण्यात आले आहे. आता हे आंदोलन कधी करायचे याबाबतचा निर्णय सोमवारी घेतला जाणार असल्याची माहिती समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.