आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Fadanvis Government Face Test,, Today Cabinet Meeting

देवेंद्र फडणवीस सरकारची सत्त्वपरीक्षा, मंत्रिमंडळाची आज महत्त्वपूर्ण बैठक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - शपथविधीचा झगमगाट, स्मारकांना भेटी, सत्कार सोहळ्यांचे सोपस्कार आटोपले असून देवेंद्र फडणवीस सरकारला बुधवारपासून सत्त्वपरीक्षेला सामोरे जावे लागणार आहे. शपथविधी झाल्यानंतर मंत्रिमंडळाची पहिलीवहिली बैठक झाली खरी; पण ती औपचारिकता होती. आता ख-या अर्थाने होणा-या पहिल्या महत्त्वाच्या बैठकीत फडणवीस व त्यांचे सहकारी कुठले निर्णय घेतात याकडे सा-या राज्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.

बुधवारी दुपारी १२ वाजता मंत्रालयाच्या सातव्या मजल्यावर कॅबिनेट हॉलमध्ये मंत्रिमंडळाची बैठक होत आहे. शपथविधी होताच झालेल्या पहिल्या बैठकीत सेवा हमी कायदा करण्याचा निर्णय घेऊन फडणवीस सरकारने आपण धडाक्याने काम करणार असल्याचे सांगितले होते. पण या सरकारपुढील आव्हाने अतिशय कठीण आहेत. अर्थ खात्याची स्थिती नाजूक असून जलसंपदा, ऊर्जा, सार्वजनिक बांधकाम या खात्यांची डागडुजी करण्यासाठी बरेच दिवस जाणार आहेत. ही डागडुजी करताना जनतेच्या हिताचे निर्णय घेणे म्हणजे कसरतीचे प्रसंग असतील, असे भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले.

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे पारदर्शी कारभारासाठी ओळखले जात होते. मात्र हा कारभारात गतिमानता नसल्याने त्यांच्या कारभाराला मर्यादा आल्या होत्या. त्यांच्या मनात असूनही जलसंपदा, ऊर्जा, सार्वजनिक बांधकाम, अर्थखात्याला ते शिस्त लावू शकले नव्हेत. ही खंत त्यांनी निवडणुकीच्या दरम्यान व्यक्त केली होती. मात्र आता फडणवीसांना आघाडीचे सरकार चालवण्यासाठी मित्रपक्षाच्या नाकदु-या काढण्याची गरज लागणार नाही. सहकारी पक्ष म्हणून शिवसेनेला सोबत घेतले तरी महत्वाची खाती आपल्याकडे ठेवून ते राज्यशकट हाकतील, असेही भाजपचा एक नेता म्हणाला.

फडणवीसांसह खडसे, मुनगंटीवार तसेच पंकजा मंगळवारी संध्याकाळी मुंबईत परतले असून मंत्रिमंडळाच्या बैठकीत काय विषय असतील, याविषयी संबंधितांकडे चौकशी केली असता बैठकीआधी यावर चर्चा होईल, असे सांगण्यात आले.

पूर्वीचे पीए, पीएस घेऊ नका : आदेश
आघाडी सरकारच्या मंत्र्यांचे पीए, पीएस घेऊ नका, असे आदेश फडणवीस यांनी आपल्या मंत्र्यांना दिले आहेत. केंद्र सरकारच्या धर्तीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. आधीच्या सरकारमधील पीए, पीएस घेतल्यास सरकार गतिमान होत नाही. ते पूर्वीसारखे चालते, अशा सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्याने हा निर्णय घेतल्याचे समजते.

"रामटेक'साठी मंत्र्यांमध्ये चुरस
माजी सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांच्याकडील 'रामटेक' बंगल्यासाठी मंत्र्यांमध्ये चुरस आहे. भुजबळांनी 'रामटेक' बंगला सेव्हन स्टार सोयी सुविधांनी सजवला आहे. पंकजा मुंडे, विनोद तावडे यांना हा बंगला भलताच आवडल्याची सूत्रांची माहिती आहे. युतीचे सरकार असताना गोपीनाथ मुंडे 'रामटेक' वर राहत असल्याने हा बंगला मिळाल्यास वडिलांच्या आठवणींना उजाळा मिळेल, असे पंकजाला वाटते. तर सतत प्रसिद्धीच्या झोतात राहणे आवडणा-या तावडेंसाठी 'रामटेक' हा प्रतिष्ठेचा विषय आहे.