आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Fadanvis Government Ignora Friend Parties Vinayak Mete

फडणवीस सरकारचे घटक पक्षांकडे दुर्लक्ष - विनायक मेटे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - भाजपच्या नेतृत्वाखालील फडणवीस सरकारला सहा महिने उलटून गेल्यावरही निवडणुकीपूर्वी आम्हाला दिलेली आश्वासने सरकार पाळू शकले नाही. त्यामुळे कुठेतरी आम्हाला दिलेल्या आश्वासनांची आठवण करून देण्याची वेळ आलेली आहे, असे सांगत रिपाइंने महायुतीतल्या घटक पक्षांची बैठक बोलावली असल्याचे शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी सांगितले.

मुंबईत १२ मे रोजी होणा-या या बैठकीला रासप, शिवसंग्राम आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते उपस्थित राहणार असून या बैठकीत सरकारसोबतचे घटक पक्षांचे धाेरण काय असावे याबाबत चर्चा केली जाणार आहे. मेटे म्हणाले, लोकसभा आणि विधानसभेत भाजपला मिळालेल्या यशात आमचाही वाटा होता. निवडणुकीपूर्वी आम्हाला दिलेल्या राजकीय आश्वासनांची पूर्तता करणे दूरच मात्र त्याची साधी आठवणही सरकारला राहिलेली नाही. महायुतीतील घटक पक्षांनी एकत्रित येऊन फडणवीस सरकारला जाब विचारण्याची तयारी चालवली आहे. या बैठकीचे निमंत्रक रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले हे असून या बैठकीत यापुढे आम्ही सरकार सोबत कसे धोरण ठेवावे या विषयावर चर्चा करणार असल्याचे ते म्हणाले.

आमच्यापैकी प्रत्येकाच्या राजकीय आणि सामाजिक भूमिका या वेगवेगळ्या असून निवडणुकीपूर्वी त्या भाजपला मान्य होत्या. तसेच सत्तेतला योग्य तो वाटा देण्याचे भाजपने मान्यही केले होते. मात्र, आता सरकार स्थापन होऊन सहा महिने उलटून गेल्यानंतरही आम्हाला योग्य ते प्रतिनिधित्व मिळत नसल्याची खंत आहे. कार्यकर्ते आता आम्हाला प्रश्न विचारू लागले आहेत. त्यामुळे आम्ही एकत्रितरित्या या बाबींचा विचार करून एक रणनीती आखणार असल्याचे मेटे म्हणाले. या बैठकीला मेटे समर्थक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.