मुंबई- भाजपचे महाराष्ट्रातील पहिले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखालील मंत्रिमंडळाचा शपथविधी शुक्रवारी वानखेडे स्टेडियमवर दिमाखदार सोहळ्यात पार पडला. मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह भाजपच्या इतर 9 नेत्यांनी शपथ घेतली. त्यात 7 कॅबिनेट 2 राज्यमंत्र्यांचा समावेश होता. मात्र, फडणवीस यांच्या दस का दम या मंत्रिमंडळाबाबत एक वेगळाच योगायोग जुळून आला आहे. 10 पैकी तब्बल 8 मंत्र्यांचे वाढदिवस हे जून व जुलै महिन्यातील आहेत. तसे पाहिल्यास फडणवीस यांचे मंत्रिमंडळाचा चेहरा तरूण आहे व या मंत्र्यांचे जून-जुलै महिन्यातील वाढदिवस असल्याने एक योगायोग साधला गेला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस 22 जुलै रोजी असतो. विनोद तावडेंचा वाढदिवस 20 जुलै, पंकजा मुंडेंचा वाढदिवस 26 जुलै रोजी तर सुधीर मुनगंटीवर यांचा 30 जुलै रोजी वाढदिवस असतो. याचबरोबर दिलीप कांबळे व विष्णू सावरा यांचा वाढदिवस 1 जून रोजी असतो. तर चंद्रकांत पाटील यांचा वाढदिवस 10 जून रोजी असतो. तर विद्या ठाकूर यांचा वाढदिवस 15 जून रोजी असतो. एकनाथ खडसे यांचा 2 सप्टेंबर रोजी तर प्रकाश मेहता यांचा वाढदिवस 22 एप्रिल रोजी असतो.