आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Fadnavis Govt Age Limit Extended In State Govt Jobs

तरूणांसाठी खूषखबर: सरकारी नोकरीसाठी वयोमर्यादा 38 ते 43 वर्षांपर्यंत वाढवली!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- महाराष्ट्र राज्याच्या सरकारी सेवेत ज्यांना जायचे आहे त्यांना फडणवीस सरकारने खूषखबर दिली आहे. सरकारी सेवेतील प्रवेशाच्या कमाल वयोमर्यादेत पाच वर्षांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे खुल्या प्रवर्गातील उमेदवार आता वयाच्या 38 व्या वर्षांपर्यंत सरकारी नोकरीसाठी अर्ज करू शकणार आहेत. यापूर्वी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना 33 वर्षापर्यंत अर्ज दाखल करता येत होते. तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना आता वयाच्या 43 व्या वर्षांपर्यंत अर्ज करता येणार आहेत. पूर्वी त्यांना 38 वर्षापर्यंत अर्ज दाखल करता येत होता.
फडणवीस सरकारने राज्यातील विविध घटकांच्या हिताच्या दृष्टीने महत्त्वाचे असणारे निर्णय राज्य मंत्रिमंडळाने विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कालावधीत घेतले आहेत. त्यापैकी महत्त्वाचा घेतलेला एक म्हणजे शासकीय सेवेतील प्रवेशासाठीच्या कमाल वयोमर्यादेत 5 वर्षाने वाढ करण्याचा निर्णय. राज्य शासन, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, जिल्हा निवड समित्या आणि विविध मंत्रालयीन विभागांनी नियुक्त केलेल्या निवड समित्यांमार्फत शासन सेवा प्रवेशासाठी घेण्यात येणा-या निरनिराळ्या पदासाठीच्या स्पर्धा परीक्षांसाठी असणाऱ्या उमेदवारांच्या कमाल वयोमर्यादेत 5 वर्षाने वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भातील शासन निर्णयही लवकरच जारी करण्यात येत आहे.
या निर्णयामुळे खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी सध्या असलेली कमाल वयोमर्यादा 33 वरून 38 वर्षे होणार असून मागासवर्गीय उमेदवारांसाठी सध्याची 38 वर्षांची वयोमर्यादा आता 43 वर्षे होणार आहे. याशिवाय सध्याच्या ज्या प्रवर्ग किंवा घटकांची कमाल वयोमर्यादा 43 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक आहे, त्यामध्ये कोणतीही वाढ करण्यात येणार नाही.