आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

खडसे-फडणवीस वाद : नाराजीनाट्य कायमच, जाहीर कार्यक्रमात एकमेकांवर कटाक्षही नाही

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मंत्रिमंडळ बैठकीस दांडी मारून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात नाराजी नाट्याचा पहिला अंक रंगवणाऱ्या महसूलमंत्री एकनाथ खडसे आणि फडणवीस यांच्यातील या नाट्याचा दुसरा अंक बुधवारी अधिकच रंगला. एका कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र आलेल्या या दोघांनी बोलणे तर सोडा साधे एकमेकांकडे पाहणेही टाळले. पाहिले मी तुला, तू मला पाहिले या गीताला साजेसे राजकीय नाट्य रंगत असताना पहिल्यांदाच फडणवीस यांनी खडसेंना महत्त्व देण्याचे संकेत दिल्याने भाजपमधील अस्वस्थता वाढली आहे.

युती सरकारला १०० दिवस होण्याच्या आतच मंत्रिमंडळातील नाराजी चव्हाट्यावर आली आहे. हवा असलेला कर्मचारी वर्ग मिळत नसल्याने खडसेंनी नाराजी जाहीर करून दाखवली. बुधवारी सह्याद्री अतिथिगृह येथे स्वच्छ भारत अभियानावर आधारीत माहितीपटाच्या प्रदर्शनानिमित्त राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री खडसे उपस्थित होते. मुख्यमंत्री खडसेंच्या मध्ये राज्यपाल बसले होते. पण दोघांनीही एकदाही एकमेकांकडे कटाक्षही टाकला नाही. तत्पूर्वी राज्यपालांच्या स्वागतासाठी फडणवीस खडसे सह्याद्री अतिथीगृहाच्या प्रवेशद्वारावर जवळपास दहा मिनिटे एकमेकांच्या बाजूला उभे होते. पण येथेही त्यांनी एकमेकांशी बोलणे बघणे टाळले. कार्यक्रमातही दोघांमधील हा अबोला कायम होता.

भाजपचे ज्येष्ठ नेते म्हणून आपल्याच मुख्यमंत्रीपदाचा मान मिळायला हवा होता अशी खडसेंची इच्छा होती. मात्र पंतप्रधान मोदींनी त्यांचे स्वप्न पूर्ण होऊ दिले नाही. खडसेंनी दुसऱ्या क्रमांकाचे महसूलमंत्रीपद काहीसे नाराजीनेच स्वीकारले. पण तेथेही त्यांची कोंडी होताना दिसत आहे. आपल्या विभागाला मनासारखे अधिकारी मिळत नसल्याने खडसेंनी मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीला दांडी मारली होती. मुंबईत असूनही आजारी असल्याचे सांगून ते बैठकीला फिरकले नाही. बुधवारी नाराजीचा हा अंक सुरू राहिला. खडसे यांच्याकडे तब्बल सहा खाती आहेत. त्या खात्याचे सचिव बदलताना किंवा नव्याने नेमणूक करताना मुख्यमंत्र्यांनी विश्वासात घेतले नाही, असा खडसेंचा आक्षेप आहे. त्याचबरोबर आपल्या कार्यालयात ज्यांची नियुक्ती स्वीय सहायक खासगी सचिव म्हणून केली आहे, त्यांच्या नियुक्तीला मुख्यमंत्री कार्यालयाने नकार दिला आहे. त्यामुळे खडसे कमालीचे संतापले आहेत.

आज पुन्हा समोरासमोर
पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभानिमित्त फडणवीस खडसे गुरूवारी अकोल्यात पुन्हा एकाच व्यासपीठावर येत आहेत. राज्यपालांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या या कार्यक्रमात तरी या दोन ज्येष्ठ नेत्यांमधील नाराजी नाट्याचा ‘सुखांत’ होणार का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

तुम्हाला काय लिहायचे ते लिहा : खडसे
बुधवारच्या कार्यक्रमानंतर प्रसारमाध्यमांनी नाराजीबद्दल खडसेंची प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी मीडियाला सरळ उडवून लावले. तुम्हाला काय लिहायचे आहे ते लिहा. मला काही बोलायचेच नाही, असे सांगून ते निघून गेले. मंगळवारी तर त्यांनी त्यांचा मोबाइलही बंद करून ठेवला होता.