आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मालवणी दारूकांडातील बळी : मृतांच्या वारसांना लाखाची मदत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मालवणी भागातील विषारी गावठी दारूने गेलेल्या बळींचा आकडा ९७ वर गेला आहे. दिवसागणिक या दारूकांडाची भीषणता वाढत चालल्याने मुंबई पोलिसांनी आता चोरट्या दारूच्या विक्रीविरोधात धडक कारवाई सुरू केली आहे. रविवारी संध्याकाळी आणखी दोघींना अटक करण्यात आली असून आतापर्यंत अटक केलेल्या आरोपींची संख्या ७ वर गेली आहे. राज्य सरकारने मृतांच्या नातेवाइकांना प्रत्येकी एक लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा केली आहे.

सर्व मृत मालवणी परिसरातील लक्ष्मीनगर, आझमीनगर, खारोडी, अंबूजवाडी आणि अली तलाव परिसरातल्या झोपडपट्ट्यांतील असल्याने या भागात सध्या भयाण शांतता पसरली आहे. गुरुवारी सकाळपासूनच या परिसरात मृत्यूचे तांडव सुरू असून रविवार रात्रीपर्यंत मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या वाढतच होती. अजूनही ४६ जणांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, पोलिसांनी चोरट्या आणि अवैध दारूची विक्री करणार्‍यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे, तर विषारी दारूकांड प्रकरणात ममता राठोड (वय ३०) आणि अॅग्नेस ऊर्फ ग्रेसी आंटी (वय ५०) यांना अटक करण्यात आली. तसेच याप्रकरणी भादंविचे कलम १२० ब आणि २०१ ही लावण्यात आले आहे.

अंत्यसंस्कारालाही लागतोय वेळ
मालवणी नजीकच्या मार्वे हिंदू स्मशानभूमीत एकाच वेळी सहा-सहा मृतदेह जाळण्याची व्यवस्था आहे. मात्र, मृतांची संख्या वाढत असल्याने अंत्यसंस्कारासाठीही मृतांच्या नातेवाइकांना तासनतास ताटकळत राहावे लागत आहे. शुक्रवारी दुपारी दोन वाजता दारूकांडाचा पहिला बळी ठरलेल्या अरविंद पटेल यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केल्यापासून या स्मशानभूमीत सातत्याने मृतदेह अंत्यसंस्कारासाठी आणले जात आहेत. साधारणपणे एका अंत्यसंस्कारासाठी तीन ते साडेतीन तास लागतात, मात्र सततचा पाऊस आणि त्यामुळे ओली झालेली लाकडे यामुळे एका मृतदेहाला अधिक काळ लागत असल्याने मृतांच्या नातेवाइकांना स्मशानात वाट पाहावी लागत आहे.
बातम्या आणखी आहेत...