आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

CM ची हमी- 'सरकार मराठा समाजासोबत; पदावर असेन तोवर परिवर्तनासाठीच काम करेन'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - किती दिवस मुख्यमंत्री राहिलो याला माझ्या दृष्टीने महत्त्व नाही, पण जेवढे दिवस पदावर राहीन परिवर्तनासाठी काम करेन, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. अण्णासाहेब पाटील यांच्या ८७ व्या जयंतीनिमित्त रविवारी नवी मुंबई येथील माथाडी कामगारांच्या मेळाव्यात बोलताना मुख्यमंत्र्यांनी मराठा मोर्चाबाबत भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, स्वतंत्र भारतात एवढ्या मोठ्या प्रमाणात पहिल्यांदाच मोर्चे निघाले असून शांततेत होत असलेल्या या मोर्चांची गंभीर दखल सरकारने घेतली आहे. राज्य सरकार मराठा समाजासोबत असून समाजाच्या मागण्यांवर निर्णय घेण्याची सरकारची तयारी असल्याचे सांगत मराठा आरक्षणाबाबत आपण अनुकूल असल्याचे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले.
मराठा आरक्षणाचा निर्णय कायदेशीर कसोटीवर टिकला पाहिजे, असे सांगून यासाठी थेट निर्णय जाहीर करण्यापूर्वी एकत्र येऊन चर्चा करावी लागेल, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी या वेळी केले. आरक्षणाच्या मुद्द्यावर पूर्ण तयारीनिशी न्यायालयात जाण्याची तयारी केली असून न्यायालयाची स्थगिती असतानाही आपल्या सरकारने मराठा आरक्षणाचा कायदा पारित केल्याचा दावाही त्यांनी केला.

मराठा समाजातील मोठा वर्ग अजूनही आर्थिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास राहिल्याचे मान्य करत मुख्यमंत्री म्हणाले की, सरकारी महाविद्यालयांत जागांची कमतरता लक्षात घेता खासगी महाविद्यालयात मराठा समाजाच्या अधिकाधिक मुलांना शिकता यावे यासाठी आम्ही लवकरच योजना तयार करू. मराठा समाजाच्या ५ लाख तरुणांना कौशल्य विकास प्रशिक्षणही दिले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
बातम्या आणखी आहेत...