आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Fake Evidence Made By ATS, Ashish Khetan\'s Sting Operation

‘एटीएस’च्या धमक्यांमुळे हिमायतविरुद्ध खोटी साक्ष, \'स्टिंग ऑपरेशन\'मधुन खुलासा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - ‘एटीएस’च्या धमक्यांना घाबरून जर्मन बेकरी स्फोट खटल्यात फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेला अतिरेकी हिमायत बेगच्या विरोधात साक्ष दिल्याचा गौप्यस्फोट या प्रकरणातील सात साक्षीदारांनी केला आहे. ‘गुलैल डॉट कॉम’ या संकेतस्थळाचे प्रमुख व शोधपत्रकार आशिष खेतान यांनी शुक्रवारी पत्रकारांना ही सीडी दाखवली. त्यांनीच या साक्षीदारांशी संवाद साधून स्टिंग ऑपरेशनद्वारे रेकॉर्डिंग केले आहे.


बेगवरील गुन्हे सिद्ध होण्यात सय्यद अब्दुल रहीम, रेहान शेख, मोहंमद अन्सारी, शेख नजीर अतीक व गौस शेख यांच्या साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्या. बेगच्या घरात आरडीएक्स भरलेल्या बॅगा सापडणे, त्याची मनोवृत्ती जिहादी असणे व स्फोटाच्या दिवशी तो पुण्यात यासीन भटकळसोबत दिसणे या तीन मुद्द्यांवरून या कटात त्याच्या सहभागावर न्यायालयाने शिक्कामोर्तब केले व फाशीची शिक्षा सुनावली. परंतु हिमायतसंदर्भातील या तिन्हीही गोष्टी खोट्या असून त्या ‘एटीएस’च्या दबावाखाली येऊन न्यायालयात सांगितल्याचा दावा साक्षीदारांनी केला आहे.


पोलिस अधिका-याला तीन लाख रुपये दिले
हिमायतकडे आरडीएक्स सापडले नाही, तो कधीही जिहादच्या गप्पा मारत नव्हता व बाँबस्फोटाच्या दिवशी म्हणजे 13 सप्टेंबर 2010 रोजी तो पुण्यात नव्हे, तर औरंगाबादमध्ये होता, असा खुलासा या साक्षीदारांनी सीडीत केला आहे. या प्रकरणात आपले नाव गोवण्यात येऊ नये, यासाठी सातव यांना आपण तीन लाख रुपये दिल्याचा दावा रेहान शेख या साक्षीदाराने केला आहे. तर स्फोटाच्या दिवशी हिमायत आपल्यासोबतच औरंगाबाद येथे मित्राच्या लग्नाच्या स्वागत समारंभात सहभागी झाला होता. ही बाब आपण न्यायाधीशांना पुराव्यानिशी सांगण्याचा प्रयत्न केला. पण आपले म्हणणे ऐकून घेण्यात आले नाही, असा आरोप शेख नजीर अतीकने केला आहे.


‘पुण्यात नेऊन पढवले’
खोटी साक्ष देण्यासाठी एटीएसच्या अधिका-यांनी आपल्याला अनेकदा पुण्यात आणून साक्षी पढवल्याचा दावाही एका साक्षीदाराने केला. त्यात पोलिस उपमहानिरीक्षक संजय लाटकर, सहायक पोलिस आयुक्त विनोद सातव, सुधाकर रेड्डी, लोबो, मिलिंद गायकवाड या अधिका-यांची नावे या साक्षीदारांनी घेतली आहेत.


फेरतपासच करावा
‘एटीएस’ने साक्षीदारांना धमकावून आणि दबाव आणून हिमायतविरोधात साक्ष देण्यास भाग पाडल्याचे या सीडीतून दिसत असल्याने या प्रकरणाचा पुन्हा तपास व्हावा, अशी मागणी आपण मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे केल्याचे खेतान यांनी सांगितले. यापैकी काही साक्षीदारांना आपल्या साक्षी बदलायच्या आहेत. पण त्यांच्या मनात ‘एटीएस’विषयी भीती आहे. चार वर्षांपासून हे साक्षीदार घाबरलेल्या अवस्थेत जीवन कंठत आहेत, असे खेतान म्हणाले.


पोलिसांच्या भीतीनेच बेगने बदलले नाव
खेतान यांच्या म्हणण्यानुसार, बेगचा एक मित्र वेरूळ शस्त्रसाठा प्रकरणात पकडला गेला होता. त्याने पोलिसांना हिमायत आपला मित्र असल्याचे सांगितले होते. विनाकारण पोलिसांचा ससेमिरा आपल्यामागे लागू नये म्हणून बेग उपजीविकेसाठी उदगीर येथे खरे नाव लपवून हसन या नावाने सायबर कॅफे चालवू लागला. अर्थार्जन करण्यासाठी मुलांना मदरशाच्या शिक्षणाचा उपयोग होत नाही, असे त्याचे मत होते. त्यामुळे तो मित्रांसोबत त्यांना केवळ 300 रुपयांत गणित, शास्त्र व इंग्रजी या विषयांच्या शिकवण्या देत असे. अतिशय कष्टपूर्वक त्याने आपला व्यवसाय जोपासला होता. त्यामुळे परिसरातील लोक त्याला हसन सर या नावाने ओळखत. पोलिसांकडून खोट्या प्रकरणात आपल्याला अडकवले जाऊ नये, यासाठी त्याने हसन हे नाव धारण केल्याचा दावा खेतान यांनी केला.


पोलिसांच्या निष्ठा
राष्‍ट्रवादी काँग्रेसला वाहिल्या

वरिष्ठांचा वरदहस्त असल्याशिवाय एटीएसचे अधिकारी हे काम करणार नाहीत, ही बाब सूर्यप्रकाशाइतकी लख्ख आहे. पोलिस अधिका-यांनी आपल्या निष्ठा कायदा-सुव्यवस्थेऐवजी राष्ट्रवादी काँग्रेसला वाहिल्या आहेत. 2006चे मुंबई बॉम्बस्फोट, मालेगाव बॉम्बस्फोट अथवा जर्मन बेकरी बॉम्बस्फोट असो.. निरपराध मुस्लिम युवकांना खोट्या प्रकरणांत पकडण्यात येत आहे. तरीही या प्रकरणाचा तपास सर्व न्यायालयीन प्रक्रिया पाळूनच करण्यात आल्याचा दावा गृहमंत्री आर. आर. पाटील करत आहेत. त्यामुळे जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणाची पुन्हा चौकशी व्हावी, अशी मागणी खेतान यांनी केली. याच मागणीसाठी त्यांनी उच्च् न्यायालयात जनहित याचिकादेखील दाखल केली असून लवकरच त्याची सुनावणीही होणार आहे.