आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न्यायालयांच्या आवारात बनावट मुद्रांकांची विक्री करणारी टोळी अटकेत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मुंबईतील विविध न्यायालयांच्या आवारात बनावट मुद्रांकांची विक्री करणाऱ्या नऊ जणांच्या टोळीला मुंबई पोलिसांच्या मालमत्ता कक्षाच्या पथकाने शुक्रवारी सापळा रचून अटक केली. वांद्रे, अंधेरी, आणि मुख्य महानगर दंडाधिकारी या मुंबईतील न्यायालयांच्या आवारात एकाच वेळी कारवाई करत पोलिसांनी हे अटकसत्र पार पाडले. या वेळी आरोपींकडून तब्बल सात लाख रुपये किंमतीचे तब्बल ३०० बनावट मुद्रांकही जप्त करण्यात आले. धक्कादायक बाब म्हणजे या टोळीमध्ये तीन वकिलांचाही समावेश आहे.
मुंबईमध्ये शासनाचे बनावट मुद्रांक विकणारी टोळी कार्यरत असल्याची माहिती पाच महिन्यांपूर्वी पाेलिसांच्या मालमत्ता कक्षाच्या पथकाला मिळाली होती. तसेच या टोळीच्या माध्यमातून मुंबईतील विविध न्यायालयाच्या आवारात जुने आणि मागील तारखांचे मुद्रांक वाढीव किंमत घेऊन सर्रासपणे विकले जात असल्याच्याही तक्रारीही येत होत्या. त्याची गंभीर दखल घेत पाेलिसांच्या पथकाने अशा काही मुद्रांकाची पडताळणी केली असता ते बनावट असल्याचे समाेर अाले. या गुन्ह्यामागे एक टाेळीच कार्यरत असल्याची माहितीही पाेलिसांना मिळाली हाेती. गुरुवारी वांद्रे, अंधेरी आणि मुख्य महानगर दंडाधिकारी न्यायालयाच्या परिसरात या टोळीतील सदस्य येणार असल्याची पक्की खबर पाेलिसांना खबऱ्यामार्फत मिळाली. त्यानंतर मालमत्ता कक्षाने गुन्हेगारी गुप्तवार्ता विभाग आणि विशेष कार्यपथकाच्या साहाय्याने सापळे लावून नऊ जणांना अटक केली. निर्मल नगर पोलिस ठाण्यात या गुन्ह्याची नाेंद करण्यात आली अाहे. गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या वतीने तपास केला जात असून अाणखी काही अाराेपी जाळ्यात अडकण्याची शक्यता अाहे.