मुंबई- एखाद्या व्यक्तीच्या चारित्र्यावर संशय, घेणे, त्यांच्यावर शिंतोडे उडविणे हीसुद्धा एकप्रकारची क्रुरताच आहे. यामुळे संबंधित व्यक्तीला मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते, असे म्हणत मुंबईतील कौटुंबिक कोर्टाने एका पतीला घटस्फोट मंजूर केला आहे. एका 45 वर्षीय पतींवर पत्नी वारंवार संशय व्यक्त करायची व त्याला त्रास द्यायची अखेर पत्नीच्या जाचातून कोर्टाने पतीची सुटका केली आहे.
याबाबतची माहिती अशी की, रेल्वेत कर्मचारी असलेले रॉबर्ट लोबो यांचे लुईस ( नाव बदलले आहे) हिच्याशी 8 मे 1995 रोजी ख्रिश्चन धर्मानुसार बंगळुरूमध्ये विवाह झाला होता. लग्नाचे पहिली काही वर्षे चांगली व व्यवस्थित गेली. मात्र 2005 पासून त्यांच्यात वाद होऊ लागले. रॉबर्ट यांची पत्नी लुईस ही त्यांच्यावर वारंवार चारित्र्याचे संशय घ्यायची. यातून या दोघांत रोजच वाद होऊ लागले. त्यांना एक मुलगी आहे. या मुलीसमोरच लुईस रॉबर्ट यांच्याशी वाद घालायची व बाहेर तुझे काहीतरी आहे असे सांगून शेजारी-पाजारी त्याला बदनाम करायची. तिच्यावर मानसिक परिणाम झाला असण्याची शक्यता असावी म्हणून रॉबर्टने तिला मानसोपचार तज्ज्ञांकडे नेले. मात्र मी व्यवस्थित असून माझ्या डोक्यावर कोणताही परिणाम झालेला नाही असे सांगत डॉक्टरांसमोरही तमाशा केला.
या सर्व घटनाक्रमांमुळे वैतागलेल्या रॉबर्टने लुईसच्या मानसिक त्रासाला कंटाळून अखेर घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. गेल्या काही दिवसापासून कोर्टात ही केस सुरु होती. अखेर निकाल रॉबर्टच्या बाजूने लागला. कोर्टाने निकाल देताना म्हटले आहे की, या केसमध्ये पत्नीने पतीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडविले आहेत. यात कोणतेही तथ्य आढळून आले नाही. त्यामुळे पतीला यादरम्यान नाहक मानसिक त्रास भोगावा लागला व बदनामीला सामोरे जावे लागले. त्यामुळे घटस्फोट मंजूर करण्यासाठी ही केस अगदी योग्य आहे अशी टिप्पणी कोर्टाने केली.