आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पालिका शाळांवर वर्षाला ९.५ कोटी खर्च, शाळा दत्तक, शंभराहून अधिक शिक्षकही पुरवले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मोलमजुरी करून जगणाऱ्या गरिबांची मुले पालिकेच्या शाळांत शिकतात. इतरांसारखे त्यांनाही दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी मुंबईतील फुलांचे व्यापारी फझलानी कुटुंब झटत आहे. हजारो मुलांची आयुष्ये सुगंधित करणाऱ्या या कुटुंबाच्या ‘आएशाबाई आणि हाजी अब्दुल लतीफ चॅरिटेबल ट्रस्ट’ या संस्थेने शाळा दत्तक घेतल्या आहेत. सुमारे ४८ शाळांना शंभरहून अधिक शिक्षक पुरवले. त्यांना वेतनही संस्थाच देते. या कामी वर्षाकाठी ९.५ कोटी खर्च करणाऱ्या फझलानी यांच्यामुळे सर्व जाती, धर्माच्या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळत असून, गळतीचे प्रमाणही घटले आहे.
‘सोपारीवाला एक्स्पोर्ट‌्स’ गुलाब फुलांच्या निर्यातीसाठी प्रसिद्ध आहे. या उद्योगसमूहाचे अध्यक्ष अब्दुल कादर फझलानी यांनी उत्पनाचा काही भाग गरीब, होतकरू विद्यार्थ्यांच्या विकासासाठी राखून ठेवण्यास सुरुवात केली. या संस्थेच्या माध्यमातून गेली ३५ वर्षे फझलानी कुटुंबीय शैक्षणिक कार्य करत आहे.

मुंबईत पालिकेच्या मराठी, हिंदी, उर्दू, इंग्रजी व गुजराती माध्यमांच्या शाळा आहेत. या शाळांची स्थिती पाहून काही शाळा दत्तक घेण्याचे विश्वस्तांनी ठरवले. पूर्वी ट्रस्टकडून विद्यार्थ्यांना गणवेष, पुस्तके, वह्या दिल्या जायच्या. मात्र शाळांत पुरेसे शिक्षक नसल्याने शैक्षणिक हेळसांड होत असल्याचे दिसून आले. त्यावर ट्रस्टच्या शैक्षणिक संस्थातून शिक्षण घेतलेले शिक्षक या शाळांत पाठवण्यास सुरुवात झाली. या शिक्षकांचा पगार व इतर खर्च ट्रस्टच करते. यामुळे शाळांतील गळतीचे प्रमाण घटले. निकालही सुधारला. शिवाय मुंबईतील आयटीआय, साबुसिद्दीक पॉलिटेक्निक स्कूलही अाम्ही चालविण्यास घेतल्या, असे ६५ वर्षीय अब्दुल कादर फझलानी यांनी सांगितले.

अनाथ मुलांचाही सांभाळ
फझलानी कुटुंबाच्या ट्रस्टतर्फे लोणावळा येथे अनाथालय चालवण्यात येते. या ठिकाणी दीडशे मुले असून त्यांचा खर्च संस्थाच करते. संस्थेच्या लाेणावळा येथील ‘फझलानी इंटरनॅशनल स्कूल’ येथे ही मुले शिकतात.

स्पर्धा परीक्षांसाठी मदत
यूपीएससी, एमपीएससीसारख्या स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या राज्यातील उमेदवारांना तीन वर्षांपासून संस्था मदत करते. आमचे मित्र फारूक नाईकवाडी व आमची संस्था होतकरू विद्यार्थ्यांची चाचणी घेऊन त्यांना या परीक्षांसाठी पुरस्कृत करतो, असे फझलानी सांगतात. आजवर २८ तरुण राज्य शासनाच्या विविध विभागांमध्ये कार्यरत आहेत. यावर्षीदेखील दहा होतकरू तरुण नोकरीस लागलेे.
बुलडाण्याचे उपजिल्हाधिकारी स्पर्धा परीक्षेसाठी प्रशिक्षण, दोन वर्षे पुण्यात वास्तव्य, भाेजनाचा खर्च या ट्रस्टने उचलला. त्यामुळेच माझी यंदा उपजिल्हाधिकारी म्हणून निवड झाली, असे मूळचे बुलडाण्याचे असलेले सिद्धार्थ भंडारे सांगतात.

जकात म्हणून देतो
^इस्लाममध्ये सांगितल्याप्रमाणे उत्पनातील २.५ टक्के ‘जकात’ म्हणून दरवर्षी राखून ठेवतो. ट्रस्टच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या विकासासाठी तीन कोटी रुपये खर्च करताे.
- अब्दुल कादर फझलानी, ट्रस्टचे अध्यक्ष
बातम्या आणखी आहेत...