आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विद्रोही कवी तुलसी परब यांचे निधन, लघुनियतकालिक चळवळीचा शिलेदार हरपला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - कवितेचे पारंपरिक आशय, घाट यांची मोडतोड करत िवद्रोहाचे नवे मानदंड प्रस्थापित करत महानगरीय वेदना आपल्या कवितेतून निष्ठेने व्यक्त करणारे मार्क्सवादी कवी तुलसी परब (७५) यांचे मुंबईत मंगळवारी निधन झाले. त्यांच्या मागे डाॅ. बाबासाहेब अांबेडकर मराठवाडा विद्यापीठातील प्राध्यापिका पत्नी वंदना सोनाळकर व २ मुले आहेत.

‘हिल्लोळ’,‘धादान्त आणि सुप्रमेय्यमधल्या मधल्या मधल्या कविता’, ‘कुबडा नर्सिसस’ आणि ‘हृद्य’ असे त्यांचे चार कवितासंग्रह आहेत. भालचंद्र नेमाडे, अरुण कोल्हटकर, अशोक शहाणे, दि.पु. चित्रे यांच्या पिढीतील ते कवी होते. लघुनियतकालिक चळवळीतले कवी म्हणून त्यांची ओळख होती. भाषाशास्त्रात त्यांनी एम.ए. केले होते. जगभरातील नामवंत कवितांचे त्यांनी अनुवादही केले आहेत. मुंबईच्या सयानी रोडला कामगार वस्तीत वाढलेल्या तुळसींची शब्दांवर असलेली पकड त्याच्या कवितेतून दिसायची. नोकरी सोडून भणंग आयुष्य जगणं त्यांनी पसंत केलं. त्यांची कविता व्यक्तिवादी नसून सामाजिक भान ठेवणारी होती. त्यामुळे प्रस्थापितांच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या लघुनियतकालिकांच्या चळवळीत त्यांनी पुढाकार घेतला. महाराष्ट्रातल्या मुक्त साम्यवादी गटाशी ते संबंधित हाेते.

लेखन आणि जीवनसंघर्ष एकाच वेळी झाला पाहिजे, या मताचे परब होते. म्हणून त्यांनी सचिवालयातील आरामातल्या आपल्या नोकरीचा राजीनाम देऊन धुळे िजल्ह्यातील शहादा सारख्या दुर्गम भागात श्रमिक संघटनेत पाच वर्षे काम केले. आयुष्यात ते कधीही अखिल भारतीय साहित्य संमेलनास गेले नाहीत. मात्र वाशी (नवी मुंबई)येथे २००५ मध्ये झालेल्या सातव्या िवद्रोही साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले होते. मूळचे कोकणातील असलेल्या परब यांचा मुंबई प्राण हाेता. पत्नीच्या नोकरीनिमित्त औरंगाबाद, संगमनेर, पुणे येथे काही वर्षे ते राहिले, तरी आपला मृत्यु मुंबईतच व्हावा, अशी त्यांची इच्छा होती. त्यांनी देहदान केल्याने त्यांचे पार्थिव सोमय्या हाॅस्पिटलकडे सुपूर्त करण्यात आले.

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...