कसलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार प्रा. राम शिंदे यांची राज्यमंत्री पदापर्यंतची वाटचाल थक्क करणारी आहे. गावचे सरपंच ते राज्याच्या मंत्रिमंडळात त्यांनी मजल मारली आहे. राज्य मंत्रिमंडळात वर्णी लागल्याने त्यांच्यावर राज्यासह मतदारसंघातील विकासकामे करून जनतेचा विश्वास आणखी दृढ करण्याची संधी मिळाली आहे.
शेतमजुराच्या कुटुंबातील असलेल्या राम शिंदे यांची परिस्थिती फारच बेताची होती. आई-वडील, तीन बहिणी असा परिवार आहे. शिक्षणात मागास असलेल्या धनगर समाजात जन्मलेल्या राम यांनी प्रतिकूल परिस्थितीतही एम. एस्सी., बी. एड्. पर्यंतचे शिक्षण घेतले. त्यानंतर शिंदे यांनी आष्टी येथील धोंडे महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून नोकरी स्वीकारली. या दरम्यान, 1995 मध्ये राज्यात भाजप-शिवसेनेचे सरकार आल्यानंतर या सरकारमधील तत्कालीन ग्रामविकासमंत्री अण्णा डांगे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचे जन्मगाव चौंडीचा सर्वांगीण विकास केला होता.
तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी, उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या हस्ते त्याची सुरुवात 25 ऑगस्ट 1995 रोजी झाली. त्यावेळी चौंडी विकासाचे काम पूर्ण करण्यासाठी डांगे यांनी राम शिंदे यांना गळ घातली. त्यामुळे त्यांनी प्राध्यापकपदाची नोकरी सोडून पूर्णवेळ या कामाकडे लक्ष दिले. त्यांच्यावर चौंडी विकास प्रकल्पाची जबाबदारी सोपवण्यात आली. या दरम्यान त्यांनी पंचायत समितीच्या जवळा गणातून प्रथम निवडणूक लढवली.
मात्र, पहिल्या प्रयत्नात त्यांना निसटता पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर 1999 मध्ये चौंडी ग्रामपंचायत निवडणूक लढवून ते सरपंच झाले. सन 2002 मध्ये जिल्हा परिषदेच्या जवळा गटातून उमेदवारी निश्चित होऊनही ऐनवेळी पक्षांतर्गत विरोधामुळे त्यांना डावलण्यात आले. याचवर्षी जामखेड बाजार समितीची निवडणूक त्यांनी अपक्ष म्हणून लढवली. परंतु केवळ एका मताने त्यांना पराभव पत्करावा लागला. सन 2004 मध्ये त्यांना चौंडी ग्रामपंचायत निवडणुकीत पराभूत होण्याची वेळ आली.
पुढे आणखी वाचा, राम शिंदे यांच्याविषयी...