आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Farmer Leader Raghunath Patil Entered In AAP, First Time Rural Face Get In State

शेतकरी नेते रघुनाथ पाटील ‘आप’मय, राज्याच्या ग्रामीण भागात प्रथमच दखलपात्र चेहरा लाभला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - महाराष्‍ट्रराज्य शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ पाटील यांनी मंगळवारी आम आदमी पक्षात प्रवेश केला. पाटील यांच्या रूपाने ‘आप’ला राज्याच्या ग्रामीण भागात प्रथमच दखलपात्र चेहरा लाभला आहे. शेतक-यांच्या प्रश्नाला युती आणि आघाडीनेही न्याय दिला नाही. त्यामुळे आपण ‘आप’चा पर्याय निवडला असल्याची प्रतिक्रिया पाटील यांनी दिली.
रघुनाथ पाटील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांचे कट्टर विरोधक समजले जातात. शेट्टी यांनी मागील आठवड्यात महायुतीशी घरोबा केला. त्यामुळे रघुनाथ पाटील साहजिकच ‘आप’मध्ये प्रवेशकर्ते झाले. निर्यातबंदी लादून केंद्र सरकार रिलायन्स आणि मफतलाल यांना अल्प किमतीला कापूस उपलब्ध करून देत आहे. उद्योगपती आणि शेतक-यांना वेगवेगळा न्याय दिला जात आहे, अशी टीका पाटील यांनी केली. राजू शेट्टी व रघुनाथ पाटील हे दोन्ही शेतकरी नेते शरद जोशी यांच्या संघटनेमधून उदयास आलेले आहेत. साखर पट्ट्यात त्यांच्या संघटनेचा जोर आहे. पाटील यांच्या रूपाने लढाऊ ग्रामीण नेतृत्व ‘आप’मध्ये आल्यामुळे पश्चिम महाराष्‍ट्रआणि मराठवाड्यात ‘आप’चा प्रवेश सुकर होण्याची शक्यता आहे. दरम्यान, आगामी लोकसभेची निवडणूक आपण नक्की लढवणार आहोत. मात्र, अद्याप मतदारसंघ निश्चित झाला नसल्याचे पाटील म्हणाले.
26 जानेवारीला यादी : आगामी लोकसभा निवडणूकीसाठी ‘आप’ची पहिली यादी 26 जानेवारी रोजी जाहीर केली जाणार आहे. पक्षाचे राज्य समन्वयक मयांक गांधी यांनी ही माहिती दिली.
सात लाख सभासद
राज्यातील सर्व जिल्ह्यात पक्ष सभासद नोंदणी चालू असून प्रत्येक जिल्ह्यात 20 हजारपेक्षा अधिक नोंदणी झालेली आहे. आजमितीस राज्यात आपला 7 लाख सभासद मिळाले असून 26 जानेवारीपर्यंत हा आकडा 15 लाखाच्या घरात जाईल, अशी माहिती राज्य समन्वयक अंजली दमानिया यांनी दिली.
पेन्शन मुद्दा उचलणार
राज्यातील वयोवृद्ध शेतकरी आणि शेतमजुरांना राज्य शासनाकडून निवृत्त वेतन मिळायला हवे, असे स्पष्ट करत आम आदमी भविष्यात शेतक-यांच्या निवृत्तीवेतनाचा प्रश्न हाती घेणार असल्याचे दमानिया यांनी स्पष्ट केले.