आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्जमाफीनंतर शेतजमीनीचे आंदोलन पेटले; हिंसक आंदोलनात 10 पोलिसांसह इतर 12 जण जखमी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अांदाेलकांच्या दगडफेकीत जखमी झालेले पाेलिस अधिकारी. - Divya Marathi
अांदाेलकांच्या दगडफेकीत जखमी झालेले पाेलिस अधिकारी.
कल्याण - डोंबिवलीजवळील मलंगगड रोडवरच्या नेवाळी गावात नौदलाच्या वतीने सुरू असलेल्या भूसंपादन प्रक्रियेला विरोध करत ग्रामस्थांनी गुरुवारी तीव्र आंदोलन केले. मात्र या आंदाेलनाला अचानक हिंसक वळण लागले. या वेळी जमावाकडून काही गाड्यांची जाळपोळ करण्यात आली. पोलिसांवरदेखील हल्ला केल्याने परिस्थिती काही काळ तणावग्रस्त झाली होती. आंदोलकांना रोखण्याच्या प्रयत्नात सहायक पोलिस आयुक्त सुनील पाटील यांच्यासह काही पोलिस कर्मचारी जखमी झाले. प्रत्युत्तरादाखल पाेलिसांनी केलेल्या लाठीमारात काही आंदोलकही जखमी झाले आहेत. विशेष म्हणजे आंदोलकांना रोखण्यासाठी काश्मिरात वापरण्यात येत असलेल्या पॅलेट गनचा वापर या वेळी पोलिसांच्या वतीने करण्यात आला.    
 
गुरुवारी सकाळी आठच्या सुमारास नौदलाच्या वतीने पोलिस संरक्षणात संरक्षक भिंतीच्या बांधकामाला सुरुवात होताच बिथरलेले ग्रामस्थ रस्त्यावर उतरले.  यामध्ये पुरुष, महिला आणि लहान मुलांचाही समावेश होता. सुरुवातीला कल्याण- मलंगगड रस्ता रोखून धरला होता. हजारोंच्या संख्येने शेतकरी आणि ग्रामस्थ रस्त्यावर उतरले होते.  टायर आणि झाडे जाळून आंदोलकांनी संताप व्यक्त केला. नेवाळी नाका येथे संतप्त आंदोलकांनी पोलिसांच्या गाड्यांनाही आग लावली. आंदोलक इतके आक्रमक होते की त्यांच्या तडाख्यातून पोलिसही सुटले नाहीत. यात अंबरनाथचे सहायक पोलिस आयुक्त सुनील पाटील यांच्यासह काही पोलिस जखमी झाले. त्यानंतर प्रशासकीय स्तरावर जोरदार हालचाली झाल्याने जिल्ह्याच्या विविध भागांतून पोलिसांच्या तुकड्या आंदोलनस्थळी दाखल होत होत्या. मात्र रस्त्यावर टायर जाळून टाकल्यामुळे तातडीची पोलिस मदत मिळण्यात अडचणी येत होत्या. 
 
दुसऱ्या महायुद्धात संपादित केलेली जमिनीचा वाद 
कल्याणजवळील अंबरनाथ तालुक्यातील मलंगगड रोडवरील नेवाळीसह आसपासच्या परिसरातील शेतकऱ्यांची तब्बल १६८४ एकर जागा दुसऱ्या महायुद्धाच्या काळात विमानतळासाठी ताब्यात घेण्यात आली होती. मात्र अद्यापही वापर न झाल्याने त्या जमिनी परत मिळाव्यात यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामस्थांचा संघर्ष सुरू आहे. सध्या ही जागा संरक्षण खात्याच्या ताब्यात असून या जागेवर नौदलाचे प्रशिक्षण केंद्र उभारले जाणार आहे.
त्यासाठी जूनच्या पहिल्या आठवड्यापासून पोलिस संरक्षणात या जागेवर संरक्षक भिंत बांधण्याचे काम नौदलाच्या वतीने सुरू करण्यात अाले आहे. मात्र त्याला ग्रामस्थांंचा विराेध अाहे. याविरोधात सुरुवातीला ग्रामस्थांनी शांतिपूर्ण मार्गाने मुंडण आंदोलन केले. कोणत्याही परिस्थितीत ही जागा नौदलाला देण्यास ग्रामस्थांचा विरोध असून त्याबाबत ग्रामस्थांनी मुंबई उच्च न्यायालयातही धाव घेतली आहे. यापैकी बऱ्याच जमिनीवर शेती होत असून या भूसंपादन प्रक्रियेदरम्यान या शेतीचे नुकसान केल्याचाही शेतकऱ्यांचा आरोप आहे. 
 
काश्मीरप्रमाणे पॅलेट गनचाही वापर  
अनियंत्रित झालेल्या जमावाला राेखण्यासाठी स्थानिक पोलिसांनी लाठीमारासह अश्रुधुराच्या नळकांड्या फाेडल्या. तरीही परिस्थिती नियंत्रणात येत नसल्याने अखेर पॅलेट गनचाही वापर करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. या दगडफेकीत दहा पोलिस आणि १२ आंदोलक जखमी झाले. जखमींना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून आंदोलकांवर सरकारी कामात अडथळा आणि खुनाच्या प्रयत्नाचे गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती ठाणे पोलिस आयुक्त परमवीर सिंग यांनी दिली.   
 
ताेडगा काढण्याचे प्रयत्न : भामरे
शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांनी सांगितले की, गेल्या अनेक वर्षांपासून या जमिनीचा वाद धुमसत अाहे. काही दिवसांपूर्वी अाम्ही केंद्रीय संरक्षण मंत्री मनाेहर पर्रीकर तसेच संरक्षण राज्यमंत्री डाॅ. सुभाष भामरे यांची शिष्टमंडळासह भेट घेऊन त्यांना हा प्रश्न साेडविण्याची विनंती केली हाेती. मात्र अद्याप हा प्रश्न सुटलेला नसल्याने जमाव रस्त्यावर उतरलेला अाहे. दरम्यान, दिल्लीत नाैदलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसाेबत बैठक घेऊन लवकरात लवकर या जागेचा प्रश्न साेडविला जाईल, असे अाश्वासन डाॅ. भामरे यांनी दिले अाहे.
 
अन्याय हाेणार नाही
- नेवाळी येथील जमिनींचा प्रश्न ७५ वर्षांपासून प्रलंबित आहे. ग्रामस्थांमध्ये मोठ्या प्रमाणावर असंतोष आहे. या प्रश्नी राष्ट्रहित डोळ्यांसमोर ठेवून सर्व सहमतीने तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे देखील त्याबाबत सातत्याने पाठपुरावा करत आहेत. संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाषजी भामरे यांच्याशी बोलणे झाले असून त्यांनी यासंदर्भात सर्व संबंधितांची तातडीने बैठक लावून तोडगा काढण्यात येईल, असे सांगितले आहे. यासंदर्भात कोणावरही अन्याय होऊ देणार नाही. 
एकनाथ शिंदे, पालकमंत्री, ठाणे जिल्हा
 
ठाणे - बदलापूर मार्ग ठप्प 
 - शेतकऱ्यांनी जमीनी पुन्हा ताब्यात देण्याची मागणी केली आहे. आपल्या मालकीच्या शेतजमिनींवर पेरणी करता येत नसल्याने आंदोलक संतप्त झाले. त्यांनी महामार्गावरील अनेक वाहनांना पेटवून देत ठाणे-बदलापूर मार्ग रोखून धरला आहे. रस्त्यावर टायरची जाळपोळ करुन रस्ता बंद करण्यात आला आहे. 
 
 यासाठी सुरु आहे आंदोलन...
 कल्याण-हाजी मलंग मार्गावरील नेवळी गावातील शेतकरी अनेक दिवसांपासून आंदोलन करत आहेत. विमानतळासाठी घेतलेली जमीन परत करावी ही त्यांची प्रमुख मागणी आहे. 
 - सरकारने विमानतळासाठी म्हणून शेतकऱ्यांची जमीन संपादित केली नंतर येथे लष्कराची छावणी उभारण्याचे काम सुरु झाले आहे. 
 - वास्तविक दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान ही जमीन ब्रिटीश आर्मीच्या ताब्यात होती. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर शेतकऱ्यांनी या जमीनीवर ताबा मिळवला. लष्कराने या जमीनीवर पुन्हा दावा केला आहे. शेतकऱ्यांचा त्याला विरोध आहे. 
 - शेतकऱ्यांचे म्हणणे आहे जमीन विमानतळासाठी संपादित केली गेली होती, तेव्हा येथे विमानतळाचेच निर्माण झाले पाहिजे. 
 
पुढे... घटनेचे आणखी फोटो आणि व्हिडिओ...
बातम्या आणखी आहेत...