आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकर्‍यांनो, कर्जाची चिंता अजिबात नको - अजित पवार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ‘पावसाचे आगमन लांबल्यामुळे राज्यातील सर्व जलसाठे केवळ पिण्यासाठीच राखीव ठेवले जातील. दुष्काळसदृश परिस्थितीमुळे शेतकर्‍यांनी खचून जाऊ नये आणि कर्जाचीही चिंता करू नये,’ असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी केले.

कृषी दिनानिमित्त वसंतराव नाईक कृषी संशोधन व ग्रामीण विकास प्रतिष्ठानतर्फे आयोजित वसंतराव नाईक कृषी पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे, अन्न व औषध प्रशासन मंत्री मनोहरराव नाईक, कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव सुधीरकुमार गोयल, वसंतराव नाईक कृषी संशोधन व ग्रामीण विकास प्रतिष्ठानेचे अध्यक्ष डॉ. बी.आर. बारवाले आदी उपस्थित होते.

पवार म्हणाले की, राज्यातील टंचाईच्या परिस्थितीचा मुख्यमंत्र्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा घेतला आहे. मी स्वत: नाशिक, पुणे आणि पालघर येथे आढावा बैठका घेतल्या आहेत. काही शहरांमध्ये पाणी कपात करावी लागत आहे. राज्यात काही ठिकाणी दुबार पेरण्यांचे संकट उभे ठाकले आहे; तर अनेक ठिकाणी पेरण्याच झालेल्या नाहीत. परिस्थिती अवघड दिसत असली तरी शेतकर्‍यांनी खचून जाऊ नये. राज्य शासन खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभे राहील.

हप्त्याची फेररचना
कुठल्याही शेतकर्‍याला कर्जाची चिंता करण्याचे कारण नाही. त्यांच्या जमिनीचा थकीत कर्जासाठी लिलाव होऊ दिला जाणार नाही. प्रसंगी शेतकर्‍यांच्या कर्जाचे, व्याजाचे पुनर्गठण किंवा कर्जाच्या हप्त्याची सोयीनुसार फेररचना करण्यात येईल, अशी घोषणाही पवारांनी केली.

(फोटो - संग्रहित छायाचित्र)