आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Farmers Relief Fund News In Marathi, Election Commission, Hailstorm

राज्याची मदत आजपासून शेतक-यांच्या खात्यात, निवडणूक आयोगाची मंजुरी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - गारपीटग्रस्तांना चार हजार कोटींच्या पॅकेज देण्याचा निर्णय बुधवारी राज्य मंत्रिमंडळाने घेतला होता. त्याला केंद्रीय निवडणूक आयोगाने गुरुवारी मंजुरी दिली आहे. यामुळे शेतक-यांच्या खात्यात शुक्रवारपासून नुकसानभरपाईची रक्कम जमा होण्यास सुरुवात होईल.


या निर्णयाची अंमलबजावणी तातडीने करण्यात येणार आहे. पंचनामे पूर्ण झालेल्या शेतक-यांच्या खात्यात तत्काळ पैसे जमा करण्यात येणार आहेत.त्यासाठी गुरुवारी रात्रीच 260 कोटी रुपये बाधित क्षेत्रातील जिल्हाधिका-यांना पाठवण्यात आले आहेत. आठवडाभरात 800 कोटी रुपयांचे वाटप करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आल्याचे राज्याचे मुख्य सचिव जे. एस. सहारिया यांनी सांगितले.


आचारसंहितेमुळे मंत्रिमंडळाच्या निर्णयाची माहिती बुधवारी रात्री आयोगाला कळवली. पॅकेजला मंजुरी दिल्याचे आयोगाचे पत्र गुरुवारी शासनाला मिळाल्याचे सहारिया यांनी सांगितले. 28 जिल्ह्यांतील 20 लाख हेक्टरला गारपिटीचा फटका बसला आहे.


अशी मिळणार मदत : जिरायतीसाठी हेक्टरी 10, बागायतीसाठी 15, तर फळबागांसाठी 25 हजार रुपये हेक्टरी भरपाई मिळणार आहे. कमाल दोन हेक्टरपर्यंत ही मदत मिळेल.


पंचनामे पूर्ण झालेल्या भागातच मिळणार मदत
नुकसानीच्या पंचनाम्याची जबाबदारी तलाठी, कृषी सहायक, ग्रामसेवकांवर आहे. त्यांनी पंचनामे पूर्ण करताच शेतक-यांच्या बँक खात्यात भरपाईची रक्कम जमा होईल. औरंगाबाद जिल्ह्यात 90 टक्के पंचनामे पूर्ण झाले आहेत.


पॅकेजचा ताळेबंद
वीज बिलापोटी 200 कोटी
कर्जाचे व्याज 260 कोटी
थेट भरपाई 3500 कोटी
एकूण 3960 कोटी


50% नुकसान हवे
प्रत्येक शेतक-याच्या 2 हेक्टर क्षेत्रापुरती नुकसान भरपाईसाठी मिळणार आहे. तसेच पिकाचे 50 टक्के नुकसान झालेले असणे आवश्यक आहे.


वीज बिल माफ
शेतक-यांचे जानेवारी ते मार्च व एप्रिल ते जुलै अशा 6 महिन्यांचे वीज बिल राज्य शासन भरणार आहे. त्याची एकूण रक्कम 200 कोटी इतकी आहे.


पीक कर्ज मुदतवाढ
पीक कर्जाची मुदत 31 डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. तसेच 31 डिसेंबरपर्यंत कोणत्याही बँकेस थकीत कर्जवसुली करता येणार नाही.


वर्षाचे व्याज नाही
पीक कर्जावरील शेतक-यांचे एका वर्षाचे व्याज शासन भरणार आहे. पीक कर्जाच्या व्याजाची तीन वर्षांसाठी पुनर्रचना करण्यात येणार आहे.


20 शेतक-यांच्या आत्महत्या
राज्यात गारपिटीनंतर 20 शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत.
त्यांना जुन्या निकषांनुसार 1 लाखाची भरपाई मिळणार आहे. तसेच गारपिटीत 28 व्यक्ती दगावल्याची माहिती सहारिया यांनी दिली.


856 कोटींची मदत केंद्राकडून बोळवण

महाराष्‍ट्रातील बळीराजाची केंद्र सरकारने अवघ्या 856 कोटी रुपयांवर बोळवण केली आहे. महाराष्‍ट्र व मध्य प्रदेशसाठी 1,351 कोटी रुपयांची आर्थिक मदत देण्याचा निर्णय कृषिमंत्री शरद पवार यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिगटाने घेतल्याची माहिती सरकारी सूत्रांनी दिली आहे. यात मध्य प्रदेशाचा वाटा 495 कोटी आहे. महाराष्‍ट्र व मध्य प्रदेश सरकारने आधीच नुकसान झालेल्या जिल्ह्यांना गारपीटग्रस्त म्हणून घोषित केले आहे. यामुळे या राज्यांना केंद्रीय मदत घोषित करण्यासाठी निवडणूक आयोगाच्या परवानगीची गरज नसल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले आहे.


मदतीची मागणी किती
5000 की 1,427 कोटी

केंद्राकडे पाच हजार कोटींची तातडीची मदत मागितली, असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले होते. प्रत्यक्षात राज्याने 1,427 कोटी मागितल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.