आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Farmers Suicide News In Marathi, Hailstorm, Relief Fund, Divya Marathi

नेत्यांचे आवाहन, मदतीच्या घोषणा, तरीही शेतकरी आत्महत्या सुरूच!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - गारपिटीच्या तडाख्याने रब्बी हंगाम हातचा गेलेल्या शेतक-यांसाठी राज्य आणि केंद्र सरकारने मदत पॅकेज जाहीर केले. त्यानुसार हेक्टरी 10 ते 25 हजारांपर्यंत मदत मिळणार आहे. असे असले तरी शेतक-यांच्या आत्महत्यांचे सत्र थांबलेले नाही.


सरकारी आकड्यानुसार राज्यात 25 शेतक-यांच्या आत्महत्या आहेत. तथापि, एकट्या मराठवाड्यातच हा आकडा तीसच्या घरात आहे. शनिवारी त्यात आणखी चौघांची भर पडली. केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी आत्महत्या करू नका, असे आवाहन शेतक-यांना केले. तरीदेखील हे सत्र थांबत नसल्याचे दिसून येत आहे. जिरायतीसाठी हेक्टरी 10, बागायतीसाठी 15, तर फळबागांसाठी 25 हजारांची मदत देण्यात येत आहे. शिवाय पीक कर्जाची व्याजमाफी, वीज बिलात माफी, थकबाकी वसुलीस स्थगिती आहे. तरीही आत्महत्यांचे सत्र थांबलेले नाही. सध्याची मदत तुटपुंजी असल्याचा आरोप होत आहे.

आत्महत्या केलेल्या शेतक-याच्या वारसांना सरकारकडून एक लाख रुपये मदत देण्यात येणार आहे.


शरद पवारांची गेवराईत ग्वाही,
मोडलेला संसार पुन्हा उभा करू

दुष्काळ, गारपिटीच्या संकटांतून शेतक-यांना बाहेर काढण्यासाठी सरकारने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. संकटाचा धीराने सामना करावा. आत्महत्या करू नयेत. मोडलेला संसार पुन्हा आम्ही उभा करून देऊ, अशी ग्वाही शरद पवार यांनी येथील सभेत शेतक-यांना दिली. गतवर्षी दुष्काळात 20 जिल्ह्यांत पशुखाद्य देणा-या गुजरातच्या संस्थांची मोदींनी चौकशी सुरू केली. गुजरातने महानंदला नोटीस व वसुलीची मागणी केली. शेतक-यांची वसुली करणारे मोदी त्यांच्या हिताची भूमिका घेऊ शकत नाहीत, अशी टीका पवारांनी केली.


आव्हाडांचा जळगावात जावईशोध, विरोधकांमुळेच आत्महत्या
राज्यातील शेतक-यांच्या आत्महत्या नुकसानीमुळे नव्हे, तर विरोधी पक्षांनी भडकवल्याने होत आहेत. नुकसानीचा बाऊ करून विरोधकांनी वातावरण भडकवले आणि भांबावलेले शेतकरी आत्महत्येचा मार्ग चोखाळत आहेत, असा जावईशोध राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांनी लावला. येथे ते पत्रकारांशी बोलत होते.


प्रचारानिमित्त आलेले आव्हाड पत्रकारांशी बोलत होते. प्रचारादरम्यान आत्महत्या केलेल्या किती शेतकरी कुटुंबांची तुम्ही भेट घेतली, असे विचारले असता आव्हाड यांनी काही शेतक-यांना भेटलो, राष्‍ट्रवादीच्या सरकारने भरभरून मदत दिल्याने ते समाधानी असल्याचे सांगितले.


सध्याचे पॅकेज तुटपुंजे,
सरसकट मदत द्या

शेतक-यांसाठी शासनाने जाहीर केलेली मदत तुटपुंजी आहे. पुन्हा विचार करून सरसकट मदत दिली जावी. गारपिटीला राष्‍ट्रीय आपत्ती जाहीर करून पिचलेल्या शेतक-यांना उभे राहण्याचे बळ द्यावे, अशी मागणी भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केली. शेतक-यांचे कर्ज माफ करण्याचा अधिकार आम्हाला नसल्याचे शरद पवार म्हणतात. परंतु 2004च्या निवडणुकीपूर्वी केंद्र सरकारने 69 हजार कोटी कर्ज माफ केले होते. तेव्हाची कर्जमाफी बँकांनी केलेली नव्हती. कर्जमाफीचा अधिकार सरकारचाच आहे. परंतु ते दिशाभूल करत आहेत, असेही मुंडे म्हणाले.


जालना, उस्मानाबाद, हिंगोलीत पाच आत्महत्या
अवकाळी पाऊस व गारपिटीने पिके गेल्याने हताश झालेल्या जालना व उस्मानाबाद जिल्ह्यात प्रत्येकी दोन शेतक-यांनी आत्महत्या केल्याची घटना शनिवारी घडली. याशिवाय हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील सवना येथे बबन नारायण नायक (50) यांनी विष घेऊन आत्महत्या केली. जालन्यात चनेगाव (ता.बदनापूर) येथील गणपत खंडू हाळदे (60) यांनी गेल्या 15 मार्च रोजी विष घेतले. औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान शनिवारी त्यांचा मृत्यू झाला. कडुबा गणपत सपकाळ यांनीही मृत्यूला कवटाळले. त्यांच्यावर हैदराबाद बँकेचे 28 हजारांचे कर्ज होते. नातलगांकडून दीड लाख रुपये त्यांनी कर्जाऊ घेतले होते. उस्मानाबाद जिल्ह्याच्या कळंब तालुक्यातील मस्सा (खंडेश्वरी) येथे रत्नाकर राजेंद्र माळी (35) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. रत्नाकर यांच्या 8 एकर जमिनीवर 3 लाख 70 हजारांचे कर्ज आहे. तसेच आरणी येथील काकासाहेब कोंडिबा मुळे (29) यांनी शेतातील कोरड्या विहिरीत उडी घेतली. यात डोक्याला दुखापत होऊन त्यांचा मृत्यू झाला.


4 एकर 30 गुंठे जमिनीतील पिके भुईसपाट झाली होती. त्यांच्यावर 22 हजारांचे सोसायटीचे कर्ज होते.