आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Farmers Vegetables Direct Comes In To The Mumbaikars House

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शेतक-यांचा भाजीपाला थेट मुंबईकरांच्या दारात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- शेतक-यांचा भाजीपाला, फळे मोबाइल व्हॅनद्वारे थेट मुंबईकरांच्या दारापर्यंत पोहोचवण्याची योजना राज्य सरकारने आखली आहे. अंधेरी येथे प्रायोगिक तत्त्वावर योजनेला सुरुवात झाली आहे.

काही दिवसांपासून भाजीपाला आणि फळांचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे मुंबईकरांना रास्त दरात भाजीपाला आणि फळे मिळावीत म्हणून राज्य शासनाच्या कृषी आणि पणन विभागाने योजना आखली. त्यानुसार रास्त दरातील विक्री केंद्रे सुरू करण्यात आली. सध्या मुंबईत अशी 100 पेक्षा जास्त केंद्रे सुरू आहेत. आता ही केंद्रे बंद करून त्याजागी मोबाइल व्हॅनद्वारे थेट घरापर्यंत भाजीपाला आणि फळे पुरवण्याची योजना विभागाने आखली आहे.
कृषी व पणनमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी योजनेबद्दल माहिती दिली. शेतक-यांच्या भाजीपाल्याला दलाल योग्य भाव देत नाहीत, तर मुंबईकरांनाही भाजीपाला योग्य दरात मिळत नाही. त्यामुळे राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत शेतक-यांकडून थेट भाजीपाला विकत घेऊन तो मुंबईकरांच्या दारापर्यंत पोहोचवण्याची योजना सुरू केल्याचे विखे-पाटील म्हणाले. महिला बचत गटांच्या माध्यमातून ही योजना राबवली जात आहे. सध्या तीन मोबाइल व्हॅन सुरू केल्या असून, लवकरच संपूर्ण मुंबईत अशा अनेक व्हॅन फिरताना दिसतील, असेही त्यांनी सांगितले.

कृषी आणि पणन विभागाने योजनेसाठी गोरेगाव येथील आरे कॉलनीतील महाराष्ट्र उद्योग विकास महामंडळाची दोन एकर जागा घेतली आहे. त्या ठिकाणी शेतक-यांचा माल उतरवला जाईल. त्यानंतर मालाची वर्गवारी व साफसफाई करून तो महिला बचत गटांना देण्यात येणार आहे. शेतक-यांना कृषी उत्पन्न बाजार समितीत मिळणा-या दराने त्यांना भाजीपाला दिला जाईल. बचत गटांना किलोमागे चार रुपयांनी दर वाढवून विकण्याची परवानगी देण्यात येणार आहे.


दररोज लागतो 1200 टन भाजीपाला
मुंबईकरांना दररोज सुमारे 1200 टन भाजीपाला लागतो. राज्य सरकारच्या या नव्या योजनेअंर्तगत 125 टन भाजीपाला मुंबईकरांना सध्या पुरवण्यात येणार असून हळू-हळू त्याची व्याप्ती वाढवण्यात येणार आहे.