आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकऱ्यांना पीक कर्जापेक्षा दुप्पट उत्पन्न मिळवून देणार; राज्य सरकारची विशेष योजना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- शेतकऱ्यांचे उत्पन्न सन २०२२ पर्यंत दुप्पट करण्याबरोबरच यंदाच्या खरीप व रब्बी हंगामात घेतलेल्या कर्जाच्या दुप्पट उत्पन्न शेतकऱ्यांनी शेतीतून मिळावे यासाठी राज्य सरकारने विशेष योजना तयार केल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून यंदाच्या खरीप हंगामापासून उन्नत शेती - समृद्ध शेतकरी मोहीम राबवण्यात येईल. यातून आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवले जाणार आहे. तसेच नैसर्गिक आपत्तीपासून पिकाचे होणारे नुकसान टाळण्यासाठीही पीक विमा योजनेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांना सहभागी करून घेतले जाणार आहे.  
 
या योजनेअंतर्गत चालू वर्षापासून तालुका हा कृषी विकास व उत्पादन वाढीसाठी नियोजनाचा घटक म्हणून मानला जाईल. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टीने या मोहिमेअंतर्गत पिकांची उत्पादकता त्यांच्या आनुवंशिक उत्पादन क्षमतेपर्यंत वाढवण्याचा प्रयत्न करणे, विकांचे वैविध्यीकरण करणे, पिकांचा उत्पादन खर्च घटविणे, बाजारभावातील चढ-उतार लक्षात घेऊन शेतमाल विक्रीचे तंत्र शेतकऱ्यांना अवगत करून देणे, शेतीपूरक व्यवसायांना चालना देणे, बाजारपेठ आधारित कृषी उत्पादनाबाबत निर्णय घेण्याच्या दृष्टीने उत्पादन कंपन्यांद्वारे शेतकऱ्यांचे संघटन करणे व शेतकऱ्यांच्या कंपन्यांची व्यावसायिक बांधणी करणे, काढणीनंतर शेतमाल हाताळणी व मूल्यवर्धन करणे आदी बाबींबर विशेष लक्ष दिले जाणार आहे.   

प्रत्येक तालुक्यातील प्रमुख पिकांची उत्पादकता वाढवण्याच्या दृष्टीने उपयुक्त अशा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी प्रचार आणि प्रसार केला जाईल. कृषी अवजारे, सूक्ष्म सिंचन संच व अन्य पायाभूत सुविधांचे अनुदान थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केले जातील. या योजनांच्या अंमलबजावणीत माहिती आणि तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जाईल. या संपूर्ण मोहिमेचे नियंत्रण राज्याच्या कृषी आयुक्तांकडे साेपवले अाहे.
बातम्या आणखी आहेत...