मुंबई- छळ करीत असल्याची पोलिसांत खोटी तक्रार करायची आणि ब्लॅकमेल करून पैसे उकळायचे, याप्रकाराच्या सुनेच्या जाचाला कंटाळून एका वृद्ध सासर्याने आत्महत्या केल्याची घटना कांदिवलीमध्ये घडली आहे. विजयकुमार नरसारिया (62) असे या सासर्याचे नाव असून आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीवरून समतानगर पोलिसांनी सुनेसह पाचजणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
विजयकुमार हे पत्नी उषा आणि मुलगा आशीषसह अशोकनगरमधील कल्पतरू गार्डन येथे राहतात. शुक्रवारी त्यांनी पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या सदर्याच्या खिशात पोलिसांना चिठ्ठी सापडली. यामध्ये सून नीलम आणि तिच्या घरच्यांनी खोटी तक्रार करून मानसिक त्रास दिल्यामुळेच आत्महत्या करीत असल्याचे विजयकुमार यांनी चिठ्ठीत लिहिले आहे.
आशीष आणि नीलम यांचा चार वर्षापूर्वी विवाह झाला आहे. काही महिने गेल्यानंतर दोघांमध्ये भांडणे होऊ लागली. म्हणून त्यांनी वांद्रे न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज केला. याचदरम्यान नीलम हिने हुंड्यासाठी सासरची मंडळी छळ करीत असल्याची तक्रार केली. याप्रकरणी आशीष आणि विजयकुमार यांना अटकही झाली होती. मात्र यानंतरही नीलमने दबाव टाकणे सुरूच ठेवला. विजयकुमार यांच्या चिठ्ठीवरून समतानगर पोलिसांनी नीलमसह तिचे वडील प्रदीप अगरवाल, आई
सोनी, भाऊ राहुल, चुलत भाऊ सुशील नरसारिया आणि काका विवेक नरसारिया यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.