आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • FDA Chief Who Cracked Down On Erring Chemists Shunted Out

महेश झगडे यांची उचलबांगडी, भापकर एफडीआयचे नवे आयुक्त

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मंगळवारी पाच ज्येष्ठ सनदी अधिकार्‍यांच्या बदल्या केल्या. त्यात अन्न व औषध प्रशासनाचे वादग्रस्त आयुक्त महेश झगडे यांचीही उचलबांगडी करण्यात आली. झगडे यांच्या जागी पालिका प्रशासन संचालक पदावर कार्यरत असलेले पुरुषोत्तम भापकर यांना नियुक्ती देण्यात आली आहे.

अन्न व औषध प्रशासन विभाग अत्यंत संवेदनशील मानला जातो. झगडे यांच्या कार्यपद्धतीविषयी अनेकांचे आक्षेप होते. मुख्य सचिव आणि मुख्यमंत्र्यांपर्यंत त्यांच्या तक्रारी गेल्या होत्या. त्याचा परिणाम आजच्या बदल्यात दिसून आला. विशेष म्हणजे झगडे यांच्याकडे मुख्यमंत्र्यांनी अद्याप कोणताही कार्यभार सोपवलेला नसून त्यांना प्रतीक्षा यादीवर ठेवण्यात आले आहे. अमरावती विभागीय आयुक्त डी. आर. बनसोड यांच्या निवृत्तीने रिक्त झालेल्या विभागीय आयुक्तपदी अपंग कल्याण विभागाचे आयुक्त ज्ञानेश्वर ढोक-राजूरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अमरावतीच्या जिल्हाधिकारीपदी बाहेरील राज्यातून प्रतिनियुक्तीवर आलेले आणि मंत्रालयात उपसचिव पदावर असलेले किरणकुमार गिट्टे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

पुणे मनपाचे आयुक्त विकास देशमुख यांना पुणे विभागीय आयुक्तपदी नियुक्ती देण्यात आली आहे. तर कोल्हापूर जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजय सूर्यवंशी यांची नव्याने निर्माण झालेल्या पालघरचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारीपदी पाठविण्यात आले आहे. कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकारी पदाची जबाबदारी कोकण विभागीय जात पडताळणी समिती प्रमुख व राज्य सेवेतील अधिकारी अविनाश सुभेदार यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.

‘दिव्य मराठी’चा परिणाम
अन्न व औषध प्रशासन विभागातील अनागोंदी ‘दिव्य मराठी’ने वृत्तमालिका लिहून चव्हाट्यावर आणली होती. या विभागात आल्यापासून महेश झगडे यांची कारकिर्द वादग्रस्त ठरली होती. झगडे यांच्या कार्यकाळात राज्यातील औषध दुकानदारांनी जाचक अटीविषयी अनेकदा संपही पुकारले होते. या सर्वाचा परिपाक म्हणून झगडेंची बदली करण्यात आल्याचे सांगितले जाते.
(फाईल फोटो : महेश झगडे)